Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रदौंडमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; फलटणचा सूत्रधार अटकेत, बांगलादेशी महिलांचा समावेश उघड

दौंडमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; फलटणचा सूत्रधार अटकेत, बांगलादेशी महिलांचा समावेश उघड

फलटण/दौंड प्रतिनिधी : दौंड-कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गावरील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा दौंड पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणाचा सूत्रधार मूळचा फलटण तालुक्यातील असल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे फलटण तालुक्याच्या प्रतिमेला धक्का बसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दौंड येथील ‘रिलॅक्स इन लॉज’मध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ३० मे रोजी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. त्यानंतर करण्यात आलेल्या धाडीत लॉजमधील आठ खोल्यांमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस आला.
या कारवाईदरम्यान सहा महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी दोन महिला या बांगलादेशी नागरिक असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेसह अन्य तपास यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
या प्रकरणी दौंड पोलिसांनी मनोज अनिल पवार (वय ३४, रा. दत्तनगर, फलटण, जि. सातारा) याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हवालदार निखिल जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी मनोज पवार याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
तपासादरम्यान संबंधित लॉज हे दौंड नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) संबंधित नेते नंदू शंकर पवार यांच्या मालकीचे असून ते भाडेतत्त्वावर चालवले जात असल्याचे समोर आले आहे.
सुटका करण्यात आलेल्या महिलांना समुपदेशन व पुढील मदतीसाठी पुणे येथील सुधारगृहात हलविण्यात आले आहे.
या घटनेनंतर फलटण परिसरात संतापाची लाट उसळली असून, काही व्यक्तींच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे तालुक्याच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments