पालखी सोहळ्यानंतर अवघ्या एका दिवसात २५ टनांहून अधिक कचऱ्याची विल्हेवाट; फलटण नगरपरिषदेची विक्रमी स्वच्छता मोहीम

0
18
पालखी सोहळ्यानंतर अवघ्या एका दिवसात २५ टनांहून अधिक कचऱ्याची विल्हेवाट; फलटण नगरपरिषदेची विक्रमी स्वच्छता मोहीम

फलटण | प्रतिनिधी : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानंतर विमानतळ मैदानावर साचलेल्या २५ टनांहून अधिक कचऱ्याची अवघ्या एका दिवसात विल्हेवाट लावत फलटण नगरपरिषदेने स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार ही विशेष स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.

दरवर्षी पालखी सोहळ्यानंतर विमानतळ परिसरातील कचरा हटविण्यास दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत असे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. मात्र, यंदा काटेकोर नियोजन, पुरेसे मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर यामुळे अवघ्या एका दिवसात संपूर्ण मैदान स्वच्छ करण्यात यश आले.

फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिवसभर अथक परिश्रम घेत ही मोहीम यशस्वी केली. या उपक्रमासाठी फलटणसह कराड, महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई नगरपरिषदांतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. विविध स्वयंसेवी संस्थांनीही या मोहिमेला मोलाचे सहकार्य केले.

स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागामार्फत संपूर्ण पालखीतळावर निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यामुळे परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवण्यास मदत झाली.

स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे यांनी सांगितले की, पालखी सोहळ्यानंतर इतक्या कमी वेळेत एवढ्या मोठ्या प्रमाणातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही फलटण नगरपरिषदेची उल्लेखनीय आणि विक्रमी कामगिरी ठरली आहे. नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन याला प्राधान्य देत प्रशासनाने ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.

— साहस Times