
पालखीनंतर अवघ्या दोन तासांत ५ टन कचरा संकलित; माळेगाव नगरपरिषदेची स्वच्छतेत आदर्श कामगिरी
माळेगाव | प्रतिनिधी :- संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त लाखो वारकऱ्यांची उपस्थिती असूनही माळेगाव शहराची स्वच्छता अवघ्या दोन तासांत पूर्ण करत नगरपरिषदेने उत्कृष्ट नियोजन आणि तत्परतेचा आदर्श घालून दिला. पालखी मार्गासह शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सुमारे ५ टन कचरा संकलित करून शहर पुन्हा स्वच्छ आणि सुंदर करण्यात आले.
नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्षा वृषाली तावरे, आरोग्य सभापती प्रमोद तावरे, मुख्याधिकारी बालाजी लोंढे, स्वच्छता निरीक्षक गणेश काकडे, मुकादम संजय रिठे, सुपरवायझर नितीन चव्हाण, एनडीके कंपनीचे महेश पवार, सर्व नगरसेवक, अधिकारी, सफाई कर्मचारी तसेच सामाजिक संस्था आणि नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
पालखीचे आगमन आणि प्रस्थान झाल्यानंतर तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. निरा-बारामती राज्य मार्ग, नगरपरिषद कार्यालय परिसर तसेच पालखी मार्गावरील सर्व प्रमुख रस्त्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांनी स्वच्छतेच्या कामाला वेग दिला. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरल्याने सफाई कर्मचाऱ्यांचा उत्साहही द्विगुणित झाला.
सर्वांनी समन्वयाने काम करत विक्रमी वेळेत शहर स्वच्छ केले. त्यामुळे पालखी सोहळ्यानंतरही माळेगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटके दिसत होते.
यावेळी स्वच्छता निरीक्षक गणेश काकडे यांनी सांगितले की, “गतवर्षी माळेगाव नगरपंचायतीला स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात दुसरा क्रमांक मिळाला होता. शहर सातत्याने स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छतेला प्राधान्य दिल्यामुळे पालखीनंतरही शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात आम्हाला यश आले.”










