Tuesday, September 1, 2026
HomeUncategorizedआनंद डांगे यांच्या रूपात धावून आला श्री पांडुरंग विठ्ठल; धाडसाने वारकरी भक्ताचे...

आनंद डांगे यांच्या रूपात धावून आला श्री पांडुरंग विठ्ठल; धाडसाने वारकरी भक्ताचे प्राण वाचवले

आनंद डांगे यांच्या रूपात धावून आला श्री पांडुरंग विठ्ठल; धाडसाने वारकरी भक्ताचे प्राण वाचवले

फलटण | प्रतिनिधी : आषाढी वारीच्या पावन सोहळ्यात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत घडलेली एक हृदयस्पर्शी घटना सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. शुक्रवार, दि. 17 जुलै 2026 रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे फलटण नगरीत आगमन झाले असताना एका वारकरी भक्ताला अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. गर्दी प्रचंड असल्याने त्या वारकऱ्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत कठीण झाले होते.

याच वेळी फलटण नगर परिषदेत कार्यरत असलेले कर्मचारी आनंद लाला डांगे हे आपले कर्तव्य बजावत होते. त्यांनी प्रसंगावधान राखत कोणाच्याही मदतीची वाट न पाहता अत्यंत धाडसाने त्या वारकरी भक्ताला स्वतःच्या पाठीवर उचलले आणि लाखोंच्या गर्दीतून मार्ग काढत वेळेत वैद्यकीय बूथपर्यंत पोहोचवले. त्यामुळे संबंधित वारकरी भक्ताला तातडीने उपचार मिळाले आणि त्याचे प्राण वाचविण्यात यश आले.

या धाडसी कार्यात गर्दीतून मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांच्या सहकारी मित्रांनीही मोलाची मदत केली. सर्वांच्या समन्वयामुळे वेळेत उपचार मिळाल्याने एका कुटुंबावर ओढवणारे मोठे संकट टळले.

ही घटना पाहणाऱ्या अनेक वारकरी आणि नागरिकांच्या भावना व्यक्त करताना, “त्या वारकरी भक्तासाठी श्री आनंद डांगे यांच्या रूपात जणू श्री पांडुरंग विठ्ठलच धावून आला,” अशी भावनिक प्रतिक्रिया उमटली.

विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही विविध आपत्कालीन प्रसंगी श्री आनंद डांगे यांनी धाडस, तत्परता आणि सेवाभावाचे दर्शन घडवत आपल्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. संकटसमयी जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

त्यांच्या या मानवतावादी कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत असून, अशा कर्तव्यदक्ष आणि सेवाभावी कर्मचाऱ्यांना समाजाचा मानाचा मुजरा आणि सलाम असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments