Sunday, August 30, 2026
Homeफलटणभारतीय संशोधनाला मोठे यश; के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या वनस्पतीजन्य पीकसंरक्षण तंत्रज्ञानाला केंद्र सरकारची...

भारतीय संशोधनाला मोठे यश; के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या वनस्पतीजन्य पीकसंरक्षण तंत्रज्ञानाला केंद्र सरकारची मान्यता

फलटण प्रतिनिधी : भारतीय शेतीमध्ये सुरक्षित, शाश्वत आणि निर्यातक्षम उत्पादनांना प्राधान्य दिले जात असताना भारतीय संशोधनावर आधारित के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या वनस्पतीजन्य (Botanical) पीकसंरक्षण तंत्रज्ञानाला भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB & RC) कडून सेक्शन 9(3) अंतर्गत अधिकृत मान्यता मिळाली आहे. ही मान्यता भारतीय कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे.

के.बी. बायो ऑरगॅनिक्सचे संचालक श्री. सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली २०१८ मध्ये सुरू झालेल्या संशोधनातून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. कंपनीच्या संशोधन व विकास (R&D) विभागातील ७५ हून अधिक संशोधकांनी तीन वर्षांहून अधिक काळ सातत्याने संशोधन करून हे तंत्रज्ञान विकसित केले. यामध्ये हजारो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रांचा अभ्यास, जैव कार्यक्षमता, विषारी परिणाम, पर्यावरणीय सुरक्षितता तसेच विविध वैज्ञानिक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. देशातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या हवामानात आणि हंगामात चाचण्या घेऊन या तंत्रज्ञानाची वैज्ञानिक पडताळणी करण्यात आली.

या नोंदणीअंतर्गत ‘फंगो रेझ’ (थायमॉल आधारित वनस्पतीजन्य बुरशीनाशक) आणि ‘थ्रिपस रेझ’ (पायपरीन-थायमॉल आधारित वनस्पतीजन्य कीटकनाशक) या दोन फॉर्म्युलेशन्सना अधिकृत मान्यता व पेटंट प्राप्त झाले आहे.

या उत्पादनांचे वैशिष्ट्य म्हणजे ती अवघ्या ४८ तासांत प्रभाव दाखवतात. तसेच त्यांचा पीक काढणी कालावधी (PHI) शून्य असल्यामुळे काढणीपूर्वी फवारणी करूनही निर्यातीसाठी आवश्यक कमाल अवशेष मर्यादा (MRL) निकष पूर्ण करण्यास मदत होते. त्यामुळे द्राक्षे, डाळिंब, भात, चहा, मसाले यांसारख्या निर्यातक्षम पिकांसाठी ही उत्पादने विशेष उपयुक्त ठरणार आहेत.

सध्या के.बी. बायो ऑरगॅनिक्स भारतातील ११ राज्यांमध्ये कार्यरत असून केनिया आणि दक्षिण अमेरिकेसह ३२ देशांमध्ये निर्यात करत आहे. या नव्या मान्यतेमुळे भारतीय वनस्पतीजन्य पीकसंरक्षण तंत्रज्ञानाला जागतिक बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेसह अनेक देशांमध्ये सेंद्रिय शेतीसाठी प्रभावी वनस्पतीजन्य पीकसंरक्षण उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षित उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळण्याबरोबरच कृषी निर्यातीतही वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रासायनिक अवशेषांमुळे भारतीय कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर अनेकदा परिणाम होत असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. तसेच देशांतर्गत बाजारपेठेतही सुरक्षित आणि मान्यताप्राप्त पीकसंरक्षण उपायांचा स्वीकार करण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर वनस्पतीजन्य तंत्रज्ञानाला मिळालेली मान्यता ही शेतकऱ्यांसाठी, ग्राहकांसाठी आणि कृषी निर्यातीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

जागतिक स्तरावर जैविक व वनस्पतीजन्य पीकसंरक्षण उत्पादनांची मागणी वाढत असून, या क्षेत्रात भारतीय संशोधनाला मोठी संधी उपलब्ध होत आहे. सुरक्षित अन्न, कमी रासायनिक अवशेष आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना देणारे हे तंत्रज्ञान भविष्यात सेंद्रिय शेतीच्या विस्तारासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments