Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रदेश - परदेश: सुरम्य आठवणींचे बेळगाव

देश – परदेश: सुरम्य आठवणींचे बेळगाव

[ad_1]

ज्ञानेश्वर मुळे33 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

बेळगावमधला मराठी बोलणारा माणूस मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांना जपतो आहे. मराठी संस्था आपले कार्यक्षेत्र वाढवत आहेत. स्वभावत: गोड असणारा लाल मातीतील मराठी माणूस आपला गोडवा आणि ओलावा टिकवून आहे. सरस्वती वाचनालय, मराठा मंडळ, सांगाती अकादमी यांसारख्या संस्था जिवंत आहेत, तोपर्यंत बेळगावात मराठी जोमाने वाढणार हे नक्की.

कोल्हापूरकरांना बेळगावविषयी अतिशय जिव्हाळा आणि आकर्षण आहे. शालेय जीवनातच माझा बेळगावशी परिचय झाला आणि मग तो महाविद्यालयीन जीवनापर्यंत वाढतच राहिला. या दरम्यान आठवणींचा एक फार मोठा खजिनाच तयार झाला.

दोन महिन्यांपूर्वी बेळगावच्या सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे आमंत्रण आले आणि मी ते तत्काळ स्वीकारले. या निमित्ताने दोनेक दिवस तिथे राहण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा त्या लाल मातीचा सुगंध आणि बेळगावच्या मंडळींच्या स्नेहातील कुंदा अनुभवण्याची संधी मिळाली. प्रसन्न अशा नव्या आठवणींची वृद्धी झाली.

सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांच्या प्रोत्साहनाने तयार झालेली वाचनालयांची दगडी दुमजली टुमदार इमारत स्वत:च एखाद्या संस्मरणीय आठवणीसारखी बेळगावच्या पटलावर उभी आहे. या वाचनालयाचे उद्घाटन सरस्वतीबाई राणीसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाल्याचा आणि इमारतीसाठी एकूण २६,९३० रुपये खर्च झाल्याचा उल्लेख असलेला शिलालेख प्रवेशद्वाराजवळच्या कारंजाच्या आधी लक्ष वेधून घेतो. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘शाकुंतल’ नाटकाचा पहिला प्रयोग दीडशे वर्षांपूर्वी सर्वप्रथम या वाचनालयात सादर केला गेला. त्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करत पुन्हा एकदा या नाटकाचा प्रयोग नव्या दमाच्या कलाकारांनी अलीकडेच सादर केला. बेळगावकर सहजासहजी इतिहास विसरत नाहीत, हेच या निमित्ताने सिद्ध झाले.

मी शालेय जीवनातच बेळगावच्या आणि बेळगावकरांच्या प्रेमात पडलो होतो. आमची कोल्हापूरची शाळा बेळगावच्या वाड्.मय चर्चा मंडळाच्या गोगटे वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करत असे. मीही त्यात भाग घेतला आणि पारितोषिके पटकावली. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे, त्यामुळे बेळगावचा नकळत परिचय झाला. वाड्.मय चर्चा मंडळाची इमारत कृष्णा टॉकीजजवळ होती. अजूनही आहे. या वाड्.मय चर्चा मंडळाच्या स्पर्धांमध्ये दूरदूरच्या शाळा – महाविद्यालयांचे विद्यार्थी भाग घेत असत. माझ्या जडणघडणीत या संस्थेची फार मोठी भूमिका आहे.

हळूहळू या गावातील संपर्क विस्तारत गेला. मारुती गल्लीत आत्माराम सावंत नावाचे कवी राहात असत. आमच्या संस्कृतच्या शिक्षिका करकरे बाई आणि त्यांचा परिचय होता. त्यांच्याकडील वास्तव्यात त्यांच्या आणि बाईंच्या कविता ऐकून आपणही कविता लिहाव्यात, असे वाटू लागले. नंतर आमच्या रामकुमार सावंत सरांच्या विवाहानिमित्त वडिलांच्या सोबत बेळगावला जाणे झाले. अनगोळपासून विवाहस्थळापर्यंत सायकलने जाणे – येणे खूप गंमतीशीर होते.

महाविद्यालयात असतानाही बेळगावला वारंवार जाणे सुरू राहिले. तेव्हा नुकतेच ज्योती कॉलेज सुरू झाले होते. दाजीबा देसाई, एन. डी. पाटील अशी मंडळी या कॉलेजशी जोडली गेली होती. तशात आमचा कोल्हापुरातील मित्र हिंदी विषयात एम. ए. करुन ज्योती कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाला. त्याच्या स्वभावानुसार त्याने सांगाती साहित्य अकादमीची स्थापना केली. बाबूराव नेसरकर आणि अन्य तरुण मित्रांच्या मैत्रीचा गोफ गुंफला. अल्पावधीत सांगाती अकादमीच्या कार्याचा विस्तार वाढला. वाचनालय, पतपेढी, अभ्यासिका असा प्रवास सुरू झाला. सीमा भागात ‘सांगाती’द्वारा साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्रातल्या प्रतिथयश साहित्यिकांना बेळगाव परिसरातील सांगाती साहित्य संमेलन हे मोठेच आकर्षण ठरले. प्रा. तुकाराम पाटील यांच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि बेळगावला जोडणारा दुवा निर्माण झाला.

तुकाराम यांच्या आग्रहामुळे अगदी तिशीतच मी स्वत:चे आत्मकथन लिहिले. त्यांच्यामुळेच मी कविता या साहित्य प्रकाराबरोबरच गद्यातही माझ्या लेखणीचा अंदाज घेऊ लागलो. पुस्तक तयार झाले आणि बेळगावच्याच जवळकर बंधूंच्या नवसाहित्य प्रकाशनाकडून ते प्रकाशित करुन घेतले. इतक्यावरच ते थांबले नाहीत. त्या पुढच्या साहित्य संमेलनात प्रसिद्ध साहित्यिक म. द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते त्या पुस्तकाचे शानदार प्रकाशन झाले. त्यानंतर काही दिवसांतच तुकाराम यांच्या अपघाती निधनाचा धक्का आम्हा सर्व मित्रमंडळींना सहन करावा लागला. आजही त्यांच्या मित्रांनी साहित्यिक – सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवली आहे, ही मात्र विशेष अभिमानाची गोष्ट आहे.

सुरुवातीच्या शालेय दिवसांपासून आजपर्यंत एकंदरीतच बेळगावातील अनेक आठवणींचा प्रवास मी अनुभवला आहे. आता कोल्हापूर – बेळगाव महामार्ग विस्तारला आहे. दिल्लीहून बेळगावला दररोज थेट विमानाने प्रवास करता येतो. पूर्वी पुण्याहून दिल्लीला येणारा मी आता बेळगावमार्गे येतो. दरम्यानच्या काळात सीमा चळवळ क्षीण झाली आहे. बेळगावचे बेळगावी झाले आहे. एकीकरण समितीलाही ग्रहण लागून घरघर लागली आहे. अधूनमधून मराठी आणि कानडी नेत्यांमध्ये शब्दांची चिखलफेक होते. पण, बेळगावच्या मागणीचा पाठपुरावा करण्याच्या बाबतीतील उदासीनता दिवसेंदिवस बळावत चालली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवरही बेळगावमधला मराठी बोलणारा माणूस मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांना जपतो आहे. मराठी संस्था आपले कार्यक्षेत्र वाढवत आहेत. स्वभावत: गोड असणारा लाल मातीतील मराठी माणूस आपला गोडवा आणि ओलावा टिकवून आहे. सरस्वती वाचनालय, मराठा मंडळ, सांगाती अकादमी यांसारख्या संस्था जिवंत आहेत, तोपर्यंत बेळगावात मराठी जोमाने वाढणार हे नक्की.

(संपर्कः dmulay58@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments