Monday, September 14, 2026
Homeसातारामहाबळेश्वरचा पाऊस माणला पोहोचला नाही, मंत्री गोरे यांचा रामराजेंवर अप्रत्यक्ष टोला

महाबळेश्वरचा पाऊस माणला पोहोचला नाही, मंत्री गोरे यांचा रामराजेंवर अप्रत्यक्ष टोला

सातारा, दि. 26: महाबळेश्वरपासून फक्त 65 किलोमीटरवर असलेल्या दुष्काळी माण तालुक्याला आजपर्यंत पाणी मिळाले नाही. दरवर्षी एक किलोमीटर काम झाले असते तर पाणी पोहोचले असते. मात्र, 20 वर्षे मंत्रीपद सांभाळूनही दुष्काळ हटवू न शकलेल्या नेत्यांच्या “कालचक्राला” सुरुवात झाली असल्याचा अप्रत्यक्ष टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला. भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या कार्यशाळेत मंत्री गोरे यांनी हे वक्तव्य केले.

साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये आयोजित या कार्यशाळेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अॅड. भरत पाटील, सुनील काटकर, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी, अविनाश कदम, चिन्मय कुलकर्णी आदी नेते उपस्थित होते.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “भाजपने सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्याला मंत्री बनवले. इतर पक्षांनी जिल्हाध्यक्षपदही दिले नव्हते. आता कार्यकर्त्यांनी पक्ष नोंदणी मोहीम यशस्वी करून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हावे. भाजपची सत्ता आली तर गावपातळीवरील विकास कामांना अडथळे येणार नाहीत, तसेच कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल.”

शिवेंद्रसिंहराजेंचे मार्गदर्शन
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण, आताच्या निवडणुकीत भाजपने तो किल्ला काबीज केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपला विजयी करण्यासाठी एकजूट दाखवा. पक्षासाठी काम करताना गाफील राहू नका, कारण पुढील 15-20 वर्षांत विरोधकांना उभे राहणे कठीण होईल.”

जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि विठ्ठल बलशेटवार यांनीही या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पक्ष नोंदणी मोहिमेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

भाजपचा निर्धार:
कार्यशाळेत नेत्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि नगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments