Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रडायरीची पाने: नवमीचे विजन

डायरीची पाने: नवमीचे विजन

[ad_1]

इंद्रजित भालेराव3 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

लोक नवमीच्या दिवशी सकाळीच उठून सगळं उरकून गावाबाहेर पडायचे. आमचा अर्धा गाव महानुभावच होता. त्यामुळं गावातही हिंसा वगैरे होण्याचा प्रश्नच नव्हता.

महानुभाव पंथामध्ये एक इंजन नावाचा सण आहे. खरं तर तो शब्द ‘विजन’ असा आहे. पण, खेड्यापाड्यातले निरक्षर लोक त्याला ‘इंजन’ असंच म्हणतात. सण म्हणण्यापेक्षा महानुभावांसाठी तो गावाबाहेर पडण्याचा दिवस आहे. जन म्हणजे लोक आणि विजन म्हणजे जिथं लोक नाहीत, असा गावाबाहेरचा एकांतातला भाग. नवरात्रातील नवमीच्या दिवशी महानुभाव लोक गावात राहत नाहीत. ते मुलाबाळांसह शेतात निघून जातात. संध्याकाळ होईपर्यंत शेतातच राहतात. तिथंच स्वयंपाक, जेवण करतात. एका अर्थानं, तो सगळ्यांचा कौटुंबिक सहलीचाच कार्यक्रम असतो. पण, त्या दिवशी काही शुभ गोष्टी घडताहेत म्हणून नाही, तर गावातलं अशुभ टाळाण्यासाठी हे सगळे शेतात जातात.

त्यामागील त्यांचं म्हणणं असं असतं की, दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमीला गावात संपूर्ण देवतांचं राज्य प्रस्थापित झालेलं असतं. त्या दिवशी ईश्वरानं त्यांना मोकळीक दिलेली असते. त्यांचा मुक्त संचार गावात दिवसभर असतो. त्या दिवशी या देवता तुम्हाला, तुमच्या देवाला काही विघ्न करण्याची शक्यता आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या देवांसह सकाळी उजाडायच्या आत गावाबाहेर पडा आणि अंधार पडल्याशिवाय गावात येऊ नका.

पूर्वी या नवमीच्या दिवशी देवीचे नवस फेडण्यासाठी फार मोठे विधी व्हायचे. गावात कोंबडे, बकरे इतकंच नाही, तर हाले म्हणजे रेड्यांचेही बळी दिले जायचे. त्याला कारान म्हणत. त्यामुळे प्रचंड मोठी हिंसा व्हायची. लोक मद्यसेवन करायचे. देवीची पूजा व्हायची. त्या दिवशी महानुभाव गावात राहिले, तर त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. कारण हे कट्टर अहिंसावादी लोक. शिवाय, महानुभावांच्या संन्याशी स्त्रियांनाही त्रास होण्याची शक्यता असे. त्यामुळे या लोकांपासून दूर गेलेलं बरं. कारण स्वत: चक्रधर स्वामींनीच ‘हिंसा वर्ते तिये ठायी महात्मेनी असू नये,’ असं सांगितलं होतं. या नवमीला सर्वत्र हिंसाच हिंसा व्हायची, म्हणूनच तिला खांडेनवमी म्हणत.

कारण तो देवीला बळी देण्याचा दिवस होता. त्यामुळेच चक्रधर स्वामींनी मातापूर म्हणजे माहूर आणि कोल्हापूर इथं कधीच जाऊ नका, असं आपल्या अनुयायांना सांगितलेलं होतं. कारण या दोन्ही ठिकाणी देवीची ठाणी आहेत. तिथेही नेहमी अशीच मोठी हिंसा होत असे. त्यामुळे ही दोन गावे चक्रधर स्वामींनी महानुभावीयांना कायमची वर्ज्यच केली होती. म्हणूनच कोल्हापुराकडं महानुभाव पंथाचे अनुयायी सापडणार नाहीत. कारण महानुभाव साधुंनी कधी तिकडे जाऊन आपल्या धर्माचा प्रचार केलाच नाही.

‘लीळाचरित्रा’तही या नवमीच्या विजनाचा उल्लेख येतो. त्या काळात चक्रधर स्वामी मराठवाड्यात जालन्यालाच होते आणि तिथं ते आपल्या भक्तगणांसह नवमीच्या दिवशी गावाबाहेर निघून गेले होते, असा उल्लेख सापडतो. जालन्यात मुक्कामी असताना एके दिवशी पहाटेच उठून चक्रधर स्वामी बाईसांना म्हणाले, ‘बाई, आज आपण गावाबाहेर जाणार आहोत.’ बाईसांनी “का?’ असं विचारल्यावर स्वामी म्हणाले, ‘आज खांडेनवमी आहे. आज देवता गावात प्रवेश करू इच्छितात. आपण गावात थांबलो तर त्यांना आपली अडचण होईल. त्यांनी रात्रीच मला कल्पना दिली की आम्हाला थोडी मोकळीक द्या. आपण गावाबाहेर जा. म्हणून त्यांना आज मी स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्या आज दिवसभर गावात थांबतील, आपण बाहेर थांबूयात.’ आणि चक्रधर स्वामी आपल्या अनुयायांसह गावाबाहेर एका शेतातल्या विहिरीजवळच्या झाडाखाली थांबले. तिथंच त्यांनी दिवसभर वनभोजन, चर्चा, उपदेश केला आणि संध्याकाळी देवता परत गावाबाहेर निघण्याच्या वेळी ते सर्वांसह गावात आले. तेव्हापासून महानुभाव पंथीय मंडळी नवमीच्या दिवशी लवकर उठून उजाडण्याच्या आत गावाबाहेर निघून जातात.

माझ्या लहानपणी अशाच प्रकारे लोक नवमीच्या दिवशी सकाळीच उठून सगळं उरकून गावाबाहेर पडायचे. शिवाय, आमचा अर्धा गाव महानुभावच होता. त्यामुळं गावातही हिंसा वगैरे होण्याचा प्रश्नच नव्हता. गावाच्या पश्चिमेचा काही भाग महानुभावेतर होता. तिथंही अशी काही हिंसा घडत नसे. पण, मातंग समाजातील स्त्रीच्या हस्ते पतर भरणे हे कार्यक्रम होत असत. त्यामुळं देवतेचं अधिष्ठान निर्माण होतं, देवता तिथे प्रवेशतात, त्या तुम्हाला त्रास करतील म्हणून तुम्ही निघून गेलं पाहिजे, असं सांगितल्यामुळं आमच्या गावचे लोकही गावाबाहेर जायचे. पण, अर्थातच ते शिवेवर किंवा खूप दूरच्या शेतात वगैरे जात नसत. कारण आमच्या गावचं दत्तमंदिर गावाबाहेरच होतं.

सगळेच लोक सकाळी या मंदिराजवळ जमा होत. आपापल्या घरची देवपूजा मंदिरात आणून ठेवत. ज्यांना एवढ्या लवकर येणे शक्य नसे ते दुसऱ्या कुणाजवळ तरी आपली देवपूजा देत आणि मंदिरात पोहोचती करीत. इतक्या सकाळी गावातल्या महिलांना गावाबाहेर पडणं शक्य नसायचं. घरातली कामं उरकलेली नसत. त्यामुळं मुलंबाळं आणि पुरुषमंडळी सकाळी निघून जात आणि बायका निवांत आपापली कामं आवरून मंदिराकडं येत. सगळ्या बायका एकत्रित मिळून पुरुषांपासून दूर कुठं तरी झाडाखाली बसून जेवण करीत. या सगळ्या गोष्टींवरुन आमचे पाहुणे आम्हाला चिडवायचे.

त्या दिवशी जणू काही मंदिराजवळ यात्राच भरत असे. सगळे लोक सकाळीच उजाडण्याच्या आधी उठून स्वयंपाक करून मंदिराजवळ येत आणि तिथंच वेगवेगळ्या झाडांखाली आपापल्या पंगती करून जेवण करीत. जेवणाचा मेनूही जणू काही निश्चित झालेला असे. दही, धपाटे, कांदा, केळी, गुळ, साखर, मेथीची भाजी असं ज्याला जे जमेल ते आणलेलं असे. पण, धपाटे मात्र सगळे लोक आणायचेच. एकमेकांच्या पदार्थांचं आदानप्रदानही होत असे. जेवण करून तरणीताठी माणसं शेतात कामाला निघून जात. म्हातारी मंडळी आणि मुलंबाळं मात्र मंदिराभोवतीच थांबत. मुलं झाडाखाली आपला खेळ मांडत आणि म्हातारी माणसं मंदिरात कुणी साधू असतील, तर त्यांच्यासोबत नामस्मरण करीत बसत.

कुणी साधु वा प्रवचनकार आला असेल, तर तो प्रवचन करीत असे. संध्याकाळच्या वेळी देवपूजा सोडली जात असे. हे दिवस म्हणजे शेतात सगळी धान्ये उधाणून आलेले दिवस असत. दिवसभर शेतात गेलेले लोक येताना सगळ्या धान्याचे तुरे घेऊन येत आणि ते देवाजवळ ठेवत. त्यामुळं देव धान्याच्या तुऱ्यांच्या कोंदणात बुजून जात. संध्याकाळी सर्व लोक एकत्रित येऊन देवपूजा, आरती करायचे आणि मग आपापल्या घरी परतायचे. असा हा विजनाचा कार्यक्रम होत असे. गावच्या मंदिरातील पुजाऱ्याच्या पत्नी वनिताबाई या विजनाची एक ओवी जात्यावर म्हणत…

गंगू पुसते रंगूला आज देव कुठं गेले.. खांडे नवमीचा दिस देव इंजनाला गेले…

(संपर्क – inbhalerao@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments