Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रवेध मुत्सद्देगिरीचा...: अवतार सिंग भसीन : परराष्ट्र धोरणाचा भाष्यकार

वेध मुत्सद्देगिरीचा…: अवतार सिंग भसीन : परराष्ट्र धोरणाचा भाष्यकार

[ad_1]

  • Marathi News
  • Opinion
  • Avtar Singh Bhasin : Foreign Policy Commentator | Rasik Special Article By Dr. Rohan Chaudhary

डॉ. रोहन चौधरी4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पडद्यासमोर जे परराष्ट्र धोरण दिसते किंवा दाखवले जाते, त्यापेक्षा जास्त घडामोडी पडद्यामागे घडत असतात. सामान्य अभ्यासक या घडामोडींशी अनभिज्ञ असतो. त्यातही परराष्ट्र धोरणात असणारी कमालीची गोपनीयता ही या धोरणाच्या संशोधनाला अधिक गुंतागुंतीची बनवते. अमेरिका, भारत, फ्रान्स, इंग्लंड यांसारख्या देशात महत्त्वाची कागदपत्रे २५ ते ३० वर्षांनी सामान्य जनतेसाठी उपलब्ध होतात. तोपर्यंत त्या घटनेची तीव्रता कमी झालेली असते. परिणामी परराष्ट्र धोरणाच्या किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या शास्त्रोक्त संशोधनाला कमालीच्या मर्यादा येतात. या सर्वांचा परिणाम म्हणजे परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासात (प्रामुख्याने भारतात) कमालीची उदासीनता दिसून येते. काही प्रमाणात ही उदासीनता दूर करण्याचे श्रेय भारतीय परराष्ट्र धोरणातील मुत्सद्दी अवतार सिंग भसीन यांना जाते.

भसीन हे भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील सर्वांत महत्त्वाच्या, परंतु दुर्लक्षित अशा इतिहास विभागाचे (Historical Division) तीस वर्षे प्रमुख होते. या काळात त्यांनी भारताच्या श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ यांच्याशी असणाऱ्या संबंधावर पाच खंड, पाकिस्तानवर दहा खंड आणि १९४७-२००० दरम्यानचे भारत-चीन संबंध यावर पाच खंड प्रसिद्ध केले. त्याचप्रमाणे, २००२-१३ या वार्षिक अहवालांवर आधारित “भारताचे परराष्ट्र संबंध” हा उपयुक्त दस्तावेज ठरावा असा खंड तसेच ‘नेहरू, तिबेट आणि चीन’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ देखील त्यांनी प्रकाशित केला. भसीन यांचे हे योगदान पारंपरिक मुत्सद्देगिरीच्या कक्षेत बसत नसले तरीही त्यांच्या या कार्याची दखल घेतल्याशिवाय भारतीय परराष्ट्र धोरणाचा तटस्थ, सर्वांगीण आणि सर्वसमावेशक अभ्यास करता येणार नाही.

भसीन यांच्या सर्वच संशोधनांचे वैशिष्ट्य म्हणजे इतिहासाचा नेमका वापर का आणि कसा करावा, याची असणारी पक्की जाणीव. त्यांचे संशोधन हे एखाद्याला नायक वा खलनायक ठरवणे अथवा कोणत्याही घटनेला वा धोरणाला यशापयशाच्या चौकटीत बंद करणे याच्या पलीकडे होते. कोणतीही महत्त्वपूर्ण धोरणे कोणत्या कालखंडात बनवली गेली, ती कशी बनवली गेली, ती बनवण्यामध्ये कोणते घटक प्रेरित होते आणि त्यांचा वर्तमानात काय परिणाम होत आहे, हे त्यांच्या संशोधनाचे सूत्र होते. इतिहासाला मित्र किंवा शत्रू नसतात. इतिहास अशा घटनांच्या पाऊलखुणा शोधतो, ज्या इतिहास घडवणाऱ्या प्रसंगांवर प्रभाव टाकतात. भसीन यांची इतिहासाची ही पक्की धारणाच त्यांना भारतीय परराष्ट्र धोरणातील एक महत्त्वाचा अभ्यासक बनवते. “नेहरू, तिबेट आणि चीन” या पुस्तकात त्यांनी आपल्या या वैशिष्ट्यांची प्रचिती दिली आहे. पं. नेहरूंच्या तिबेट धोरणांचा या पुस्तकात विस्तृत आढावा घेतला असून, आजच्या परिप्रेक्षात भारत-चीन संबध समजून घेण्यासाठी हे संशोधन अतिशय उपयुक्त आहे.

भसीन यांच्या संशोधनाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक घटनेची कालक्रमानुसार ठेवण्यात आलेली नोंद. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, चीन यांच्यावरील आपल्या पुस्तकात छोट्यातील छोट्या नोंदीचे खूप विस्तृत वर्णन त्यांनी केले आहे. यामुळे कोणतेही धोरण आखताना पूर्वी त्याबद्दल काय विचार होता, त्या धोरणाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया काय होती, या अंमलबजावणीत कोणत्या घटकांचा अंतर्भाव होता, या सर्वांचा विचार करून त्यांनी दक्षिण आशियातील देशांच्या भारताशी असणाऱ्या संबंधांचा अतिशय बहुमूल्य दस्ताऐवज निर्माण करून ठेवला आहे.

इतिहास हे राजकीय प्रक्रियेचे एक महत्त्वाचे साधन असते. इतिहासाचे उदात्तीकरण करणे, खोटा इतिहास सांगणे किंवा इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी जाणूनबुजून समोर न आणणे हे प्रकार निंदनीय असले, तरीही त्या त्या काळांतील राजसत्तांकडून या गोष्टीला अभय मिळतच असते. राजसत्तांच्या या क्षणिक राजकीय फायद्यासाठी सामाजिकशास्त्राचे आणि पर्यायाने समाजाचे आणि देशाचे जे नुकसान होते ते कधीही भरून न येणारे असते. या समस्येला उत्तर म्हणून भसीन यांच्या संशोधनाकडे बघितले पाहिजे. समाजात घडणारी घटना, मग ती प्रिय असो अथवा अप्रिय; त्याविषयीची माहिती मिळणे, हा सामान्य जनतेचा मूलभूत अधिकार आहे. या प्रेरणेतूनच भसीन यांनी इतक्या विपुल प्रमाणात संशोधन केले. सामान्य संशोधकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला हा ज्ञानाचा खजिना हा भारताच्या जागतिक राजकारण आणि परराष्ट्र धोरणासाठी अमूल्य ठेवा ठरेल. यातून भारतीय परराष्ट्र धोरणावर संशोधन करण्यासाठी तरुण संशोधकांना कायमस्वरूपी ऊर्जाही मिळेल. तसेच, आपल्या परराष्ट्र धोरणाची व्यापक चिकित्सा करण्याच्या दृष्टीनेही भसीन यांचे संशोधन उपयुक्त ठरेल.

(संपर्क- rohanvyankatesh@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments