पुणे | प्रतिनिधी : पुण्यातील नाना पेठ येथील सकलपीर तालीम मंडळाने साकारलेला ‘विकासाचे अजित पर्व’ हा देखावा सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. स्व. अजितदादांच्या बालपणापासूनच्या जीवनप्रवासासह त्यांचा संघर्ष, सार्वजनिक जीवनातील वाटचाल आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामांचा वेध या देखाव्यातून घेण्यात आला आहे.
स्व. अजितदादांच्या आयुष्यातील विविध टप्पे कलात्मक पद्धतीने मांडताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रवास प्रभावीपणे उलगडण्यात आला आहे. त्यांच्या बालपणापासून सुरू झालेला प्रवास, राजकारणातील प्रवेश, सार्वजनिक जीवनातील संघर्ष आणि विविध जबाबदाऱ्या सांभाळताना केलेले कार्य यांचे दर्शन या देखाव्यातून घडते.
या देखाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध विकासकामांच्या प्रतिकृती. बारामती पंचायत समिती, नूतन बस स्थानक, पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस तसेच समृद्धी महामार्ग यांसह विविध विकास प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले आहे. या प्रतिकृतींच्या माध्यमातून विकासकामांची संकल्पना आणि त्यामागील प्रवास नागरिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
देखाव्यातून स्व. अजितदादांच्या कार्यातील विविध पैलू अधोरेखित करण्यात आले असून, त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाची आठवण करून देण्यात आली आहे. त्यांच्या कार्याचा प्रवास आणि विकासकामांची मांडणी पाहताना अनेकांना भावनिक अनुभव येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘विकासाचे अजित पर्व’ हा देखावा साकारण्यासाठी सकलपीर तालीम मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कलाकारांनी घेतलेले परिश्रम विशेष उल्लेखनीय ठरत आहेत. स्व. अजितदादांचा जीवनप्रवास आणि कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमाबद्दल मंडळाचे कौतुक होत आहे.
