अकलूज प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या माळशिरस तालुक्यात आज वरुणराजाने दमदार पुनरागमन केले. वेळापूर, अकलूज, माळीनगरसह तालुक्यातील विविध भागांत जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. तसेच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, आज अचानक वातावरणात बदल होऊन अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी मुसळधार सरी बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.
या पावसामुळे कोरड्या पडलेल्या जमिनीला चांगला ओलावा मिळाला असून, खरीप पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले असून, आगामी काळातही पावसाची साथ मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
वेळापूर, अकलूज, माळीनगर तसेच माळशिरस तालुक्यातील इतर भागांत झालेल्या या पावसामुळे परिसरातील वातावरणही आल्हाददायक झाले आहे. माळरानावर आणि शेतशिवारात पुन्हा हिरवाईची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.
माळशिरस तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेलाही त्याचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
