डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीलढ्यांवर आयु. विठ्ठल निकाळजे यांचे मार्गदर्शन
फलटण : भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटणच्या वतीने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकेअंतर्गत फलटण तालुक्यातील ५६ गावांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून गावागावांत धम्मविषयक प्रबोधन, बौद्ध समाजातील ऐतिहासिक परंपरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक परिवर्तनाचे विचार आणि संघटनात्मक कार्याची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मिरगाव, ता. फलटण येथे वर्षावास धम्म प्रवचन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतीलढे’ या विषयावर भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटणचे माजी कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे सर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन हे सामाजिक विषमता, जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे उदाहरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयु. निकाळजे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या विविध सामाजिक व परिवर्तनवादी लढ्यांचा आढावा घेतला. महाड चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन, नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन, अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठीचा संघर्ष, शिक्षणाचा आग्रह, सामाजिक समतेसाठीची चळवळ आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीतील योगदान या विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित आणि शोषित समाजाला केवळ हक्कांची जाणीव करून दिली नाही, तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा परिवर्तनाचा मार्ग दाखविला. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती आणि समाजाची मानसिक गुलामगिरी दूर करण्याचे त्यांनी महत्त्व अधोरेखित केले. सामाजिक समता, स्वाभिमान, बंधुता आणि न्याय यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला, असे त्यांनी सांगितले.
वर्षावास प्रवचन मालिकेचा उद्देश केवळ प्रवचनापुरता मर्यादित नसून बुद्धांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सामाजिक परिवर्तनाची भूमिका गावागावांत पोहोचविणे हा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील नव्या पिढीला आपल्या इतिहासाची, चळवळीची आणि परिवर्तनाच्या विचारांची ओळख होण्यास मदत होते, असेही सांगण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. बी. एच. लोंढे सर यांनी बीएसआय मिशन 25 अंतर्गत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुरू असणाऱ्या उद्दिष्टांचा पुनरुच्चार करून सर्वांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गाव तिथे बौद्धाचार्य, गाव तिथे शाखा, व गाव तिथे सैनिक उद्दिष्ट त्यांनी प्रभावीपणे मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्म संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या प्रवचन मालिकेचा आढावा त्यांनी घेतला. त्यांनी वर्षावासाच्या काळात ग्राम शाखेच्या निर्मितीसह सभासद नोंदणी, ग्राम शाखा निर्मिती, समता सैनिक दल प्रशिक्षण, महिलांसाठी उपासिका शिबीर व श्रामनेर शिबिराचा आयोजन करण्याचा विचार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षक आयु. चंद्रकांत मोहिते यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करत वर्षावास प्रवचन मालिकेच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील विविध गावांमध्ये धम्मविषयक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती दिली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेचे महासचिव आयु. केशव ठोंबरे तसेच कोषाध्यक्ष आयु. राजकुमार रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही वर्षावास प्रवचन मालिकेच्या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
मिरगाव येथील बौद्ध उपासक-उपासिका व नागरिकांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन शिक्षण, संघटन, समता आणि सामाजिक प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
