Tuesday, September 22, 2026
Homeफलटणमलवडी येथे वर्षावास धम्म प्रवचन उत्साहात

मलवडी येथे वर्षावास धम्म प्रवचन उत्साहात

बौद्ध सण-उत्सवांचे ऐतिहासिक व धम्मविषयक महत्त्व महावीर भालेराव यांनी उलगडले

फलटण : भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटणच्या वतीने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकेअंतर्गत फलटण तालुक्यातील ५६ गावांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून विविध गावांमध्ये धम्मविषयक प्रबोधन, बौद्ध संस्कृतीची माहिती, सामाजिक समतेचे विचार आणि भारतीय बौद्ध महासभेच्या विविध उपक्रमांची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमांतर्गत मलवडी, ता. फलटण येथे वर्षावास धम्म प्रवचन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटणचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांनी ‘बौद्धांचे सण आणि उत्सव’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. बौद्ध समाजातील विविध सण, उत्सव आणि स्मृतिदिन हे केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित नसून त्यामागे बुद्धांचा धम्म, प्रज्ञा, करुणा, समता आणि सामाजिक परिवर्तनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भालेराव यांनी वैशाख पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा आणि इतर पौर्णिमांचे महत्त्व स्पष्ट करताना भगवान बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांशी त्यांचा असलेला संबंध सांगितला. तसेच बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), मनुस्मृती दहन दिन (२५ डिसेंबर), महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) यांचे सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व त्यांनी विशद केले. चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कार्याची माहिती देताना बौद्ध धम्माच्या प्रसारात त्यांच्या योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.

यावेळी आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान’ या विषयावर माहिती दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या व्यापक ऐतिहासिक प्रक्रियेच्या संदर्भात हैदराबाद संस्थानातील परिस्थिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक, राजकीय व घटनात्मक भूमिका याविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आयु. नानासो मोहिते यांनी BSI Mission 25 विषयी मार्गदर्शन केले. सातारा जिल्हा पूर्व भागातील गावागावांत धम्मविचार, संघटन आणि सामाजिक प्रबोधन पोहोचविण्याच्या दृष्टीने मिशनची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या समता सैनिक प्रशिक्षण शिबिर, उपासिका शिबिर, श्रामणेर शिबिर आणि बाल संस्कार शिबिरांमध्ये अधिकाधिक कार्यकर्ते व उपासक-उपासिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच ‘गाव तिथे शाखा, गाव तिथे बौद्धाचार्य आणि गाव तिथे सैनिक’ या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात संघटनात्मक बांधणी आणि धम्मविषयक प्रबोधनाची चळवळ मजबूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गावागावांत धम्मविचार पोहोचविण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुक्याचे माजी संस्कार सचिव आयु. बजरंग गायकवाड यांनी केले. त्यांनी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे नियोजन, उद्दिष्टे आणि ५६ गावांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रबोधनात्मक कार्यक्रमांची माहिती दिली. वर्षावास हा धम्माचे चिंतन, अध्ययन, संवाद आणि संघटन अधिक बळकट करण्याचा कालखंड असून त्याचा उपयोग समाजप्रबोधनासाठी व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

कार्यक्रमास मलवडी येथील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.  उपस्थितांनी प्रवचनमालेतील विषयांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावागावांत अशा प्रकारच्या धम्मप्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून बुद्ध-आंबेडकरी विचार, समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची भूमिका अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments