Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: 'ज्ञानबा - तुकाराम' गजर एकोप्याचा!

रसिक स्पेशल: ‘ज्ञानबा – तुकाराम’ गजर एकोप्याचा!

रसिक स्पेशल:  ‘ज्ञानबा – तुकाराम’ गजर एकोप्याचा!

[ad_1]

डॉ. श्रीरंग गायकवाड2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पंढरीच्या वाटेवर वारकरी जे ‘ज्ञानबा-तुकाराम’ भजन म्हणत गेली शेकडो वर्षे चालतायत ना, तो या महाराष्ट्राच्या ऐक्याचा मंत्र आहे! या दोन्ही संतांच्या नावांमध्ये सर्वच संतांचा सामावेश आहे. या संतांनी आपल्याला प्रेमाने, बंधुभाव – एकोप्याने राहायला शिकवले आहे. त्यामुळे फूट पडण्याचे कितीही प्रसंग आले, तरी इथे ‘ज्ञानबा-तुकाराम’चा गजर घुमतो आहे, तोपर्यंत हा समाज अभंग राहणार आहे.

गेले काही महिने आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे समाजजीवन ढवळून निघाले आहे. इथे पिढ्यान् पिढ्या गुण्यागोविंदाने नांदणारा समाज एकमेकांकडे संशयाने बघू लागला आहे. आपापल्या जातींभोवती पुन्हा भिंती बांधणे सुरू झाले आहे. राजकारणी लोक त्याचा लाभ न घेतील तरच नवल! निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे हे वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. समाजात एकीकडे अशी कमालीची अस्वस्थ स्थिती असताना, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगतगुरू संत तुकोबारायांच्या पालख्यांनी लाखो मनांना आश्वस्त करीत पंढरीच्या वाटेने प्रस्थान ठेवले आहे.

मुळात विविध जाती-धर्म, पंथ, विचार, आचार, संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात हजारो वर्षे सुखेनैव एकत्र नांदत आहेत. तथापि, कोणत्याही काळात समाजात दुही माजवणारी प्रवृत्ती निर्माण होऊ शकते, हे संतांच्या लक्षात आले होते. त्यामुळे बाराव्या शतकापासून संतांनी समतेची चळवळ सुरू केली. कटेवर कर असणारा, सर्वांना समानतेने वागवणारा, प्रेम-बंधुभावाचा संदेश देणारा सावळा विठुराया त्यांच्या चळवळीचे प्रतीक बनला. बौद्ध, जैन, महानुभाव, नाथ, लिंगायत आदी विचारधारांचा प्रभावकाळ सरत असताना वारकरी पंथाचा उदय झाला. संत ज्ञानेश्वरांनी या पंथाचा पाया घातला आणि त्याचा विस्तार केला, संत नामदेवांनी. ज्ञान हे कोणत्याही एका जातसमूहाची मक्तेदारी होऊ नये, ते तळगाळापर्यंत समानतेने झिरपावे, विशेषत: उपेक्षित, वंचित, दुबळ्या समाजघटकांना बळ मिळावे, अशी भूमिका ज्ञानदेवांनी मांडली. त्यासाठी त्यांनी श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेचा आधार घेतला. कारण महर्षी व्यासांनी भगवद्गीता ही मुख्यत: धर्म आणि अध्यात्म यांच्यापासून वंचित ठेवलेल्या स्त्रिया आणि शूद्र यांच्यासाठी लिहिली होती. ज्ञानेश्वरांच्या काळात धर्मशास्त्राचा आधार सांगत स्त्री, शूद्रांना अधिकारांपासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे..

वेदु संपन्न होये ठांइं।

परि कृपणु आन नाहीं।

जें कानिं लागला तिहिं।

वर्णाचां चि॥

अर्थात वेदाने ‘कृपण’ होऊन तीन वर्णांना जवळ केले आणि चौथ्या शूद्र वर्णाला दूर लोटले, हा सरळसरळ पक्षपात असल्याचे निदर्शनास आणत ज्ञानदेवांनी बंडाचा झेंडाच फडकावला. वेदांनी पक्षपात केला, संकुचितपणा दाखवला. पण त्याचवेळी गीतेने व्यापक दृष्टी दाखवली, सर्वांना समानतेने, मायेने पोटाशी धरले, अशी मांडणी त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून केली. त्यामुळे स्त्री-शूद्रादी बहुसंख्येने असलेल्या समाजाला आपला अधिकार मिळाला. विशेष म्हणजे, ज्ञानदेवांनी हे तत्त्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी संस्कृतऐवजी प्राकृतात अर्थात मराठीत लिहिली. त्यातून त्यांनी सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे उघडून दिली. काढुनिया गुह्य। वेद केले फोल।। असे कौतुकोद्गार संत नामदेवांनी त्याबद्दल काढले. कोणत्याही धर्माला, पंथाला त्याचे तत्त्वज्ञान समाजात रुजवण्यासाठी पायाभूत ग्रंथ लागतो. वारकरी पंथासाठी ‘ज्ञानेश्वरी’ हा आधारग्रंथ बनला.

ज्ञानदेवांनी सांगितलेले समतेचे तत्त्वज्ञान घेऊन मग संत नामदेव.. नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।। म्हणत देशभर फिरले. त्यांनी विविध अधिकारहीन जातींतून संत घडवले. आणि समतेच्या वारकरी विचारांचा विस्तार केला. या मांदियाळीत ब्राह्मण परिसा भागवतांपासून ते अंत्यज चोखामेळा आणि दासी जनी ते गणिका कान्होपात्रा असे अनेक संत उभे राहिले. उत्तर भारतातील शीख धर्माचा पाया त्यांच्याच विचारांतून घातला गेला. समता प्रस्थापित करणारे संत कबीर, संत नरसी मेहता, संत मीराबाई हे त्यांच्याच विचारांतून घडले. शूद्रांना मंदिरात जाण्यास धर्म नियमांनी मज्जाव केला होता. मग नामदेवांनी देवच चंद्रभागेच्या मोकळ्या वाळवंटात आणला. विठुराया सर्वांसाठी खुला झाला आणि त्याच्याभोवती सर्व संतांनी समतेचा खेळ मांडला.

त्यानंतर सोळाव्या शतकात ही संत चळवळ मंदावत असताना तिचे पुनरुज्जीवन केले, पैठणच्या संत एकनाथ महाराजांनी. त्यांनी संत ज्ञानेश्वरांचे राहिलेले काम पूर्ण केले. म्हणजे भागवताच्या अकराव्या स्कंधावर मराठी टीका रचली. गीता आणि भागवत यांच्यातील संबंध स्पष्ट करत, भागवत हा गीताईचा पुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यात जसा अर्जुनाला उपदेश केला, तसाच स्वतःचा चुलतभाऊ असलेल्या यादवकुलातील उद्धवालाही उपदेश केला. हाच उपदेश भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंधात आहे. या भागवतात वर्णजातिनिरपेक्ष आणि श्रेष्ठ-कनिष्ठ भावाचे अवडंबर न माजवता भक्ती कशी श्रेष्ठ आहे, याचे विवेचन आहे. हा गीतेच्याच तत्त्वज्ञानाचा विस्तार आहे. या माध्यमातून संत एकनाथांनी समतेचे विचार व्यापक केले. त्यामुळे वारकऱ्यांना गीतेप्रमाणे भागवतही प्रमाण आणि प्रिय आहे. ज्ञानभाषा संस्कृत असावी, असा दंडक असताना ‘संस्कृत वाणी देवे केली, तरी प्राकृत काय चोरापासून झाली?’ असा सवाल नाथबाबांनी उपस्थित केला आणि आपले सर्व लिखाण बहुजनांना समजणाऱ्या मराठीतून केले. त्यापुढेही जाऊन एकनाथांनी क्रांती केली. त्यांनी ग्रंथातील हे समतेचे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जीवनात जगून दाखवले. अस्पृश्य समजला जाणाऱ्या समाजातील स्त्री-पुरुषांना घरी बोलावून जेवू घालणे, त्यांच्या घरी जाऊन जेवणे, काशीहून आणलेले गंगेचे पाणी गाढवाला पाजणे, हिंदु-मुस्लिम ऐक्य सांगणे, गरजवंताला जळण म्हणून घरातील पलंग फोडून देणे अशा अतर्क्य गोष्टी त्यांनी प्रत्यक्षात आणल्या. सर्व संतांचा हा विचार कळसाला नेला, तो संत तुकाराम महाराजांनी.

यारे यारे लहानथोर।

याति भलती नारीनर।

किंवा सकळांसी येथे आहे अधिकार।। असे ते आपल्या अभंगांतून सांगत राहिले. त्यांचा ‘पवित्र ते कूळ। पावन तो देश..’ अशा मुखड्याचा एक अभंग आहे. त्यात ते संत मांदियाळीत सर्व जाती-जमातींचे संत कसे सामील झाले होते, याची जंत्रीच देतात…

वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार।

धागा हा चांभार रोहिदास॥

कबीर मोमीन लतीब मुसलमान।

सेना न्हावी जाण विष्णुदास॥

कान्होपात्रा खोदु पिंजारी तो दादू।

भजनी अभेदू हरीचे पायी॥

चोखामेळा बंका जातीचा महार।

त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी॥

नामयाची जनी कोण तिचा भाव।

जेवी पंढरिराव तियेसवे॥

मैराळा जनक कोण कुळ त्याचे।

महिमान तयाचे काय सागों॥

यातायातीधर्म नाही विष्णुदासा।

निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं॥

एखाद्या जातीने स्वत:ला श्रेष्ठ मानून इतरांना तुच्छ मानणे किंवा बहुसंख्यांनी एक होऊन एखाद्या जातीला वाळीत टाकणे, या सर्व प्रकारांतून वारकरी संतांनी समाजाची सुटका केली.

संतांनी अभंगरुपाने सांगितलेले हेच विचार गात वारकरी पंढरीची वाटचाल करतात. तुकोबारायांचे सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी तुकोबारायांनंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेऊन १६८० पासून सोहळ्याने पंढरपूर वारीला जाण्यास सुरूवात केली. त्याचवेळी त्यांनी ‘ज्ञानबातुकाराम’ हे भजनही सुरू केले. या दोन नावांमध्ये सर्वच संतांचा अंतर्भाव होतो. आज साडेतीनशे वर्षांनंतरही हे भजन म्हणत वारकरी पंढरीची वाट चालतात. ‘ज्ञानबातुकाराम’ हे भजन म्हणजे बेकीला दूर ठेवत, एकी घट्ट करणारा गजर आहे. पंढरीच्या वाटेवर तो जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत या समाजात कोणीही फूट पाडू शकणार नाही, हे नक्की.

(संपर्कः dnyanabatukaram@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments