खलनिग्रहणाय: षड्दोष हेच गुन्हेगारीचे मूळ

0
15
खलनिग्रहणाय:  षड्दोष हेच गुन्हेगारीचे मूळ


डॉ. भूषणकुमार उपाध्याय2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

शिक्षण हे फक्त पोट भरण्याचे माध्यम नाही, तर भावनांच्या संतुलनाचे आणि विवेकबुद्धीच्या जागरणाचेही ते साधन आहे. त्यामुळे हे शिक्षण हातासोबतच हृदय आणि मेंदूलाही बळकट करणारे असावे. हातामुळे रोजगार मिळेल, हृदयाने आपुलकी, प्रेम वाढेल आणि मेंदूने वैचारिक शक्ती उत्पन्न होईल. आणि असा समतोल साधला गेला की माणूस गुन्हा करणार नाही.

पोलिस दलात रुजू झाल्यापासून मी काही विधाने सतत ऐकत आलो आहे… ‘त्याने रागाच्या भरात खून केला’ किंवा ‘त्याने लोभापोटी चोरी केली.’ आता रागाच्या भरात म्हणजे काय? आणि लोभापोटी म्हणजे तरी काय? या शब्दप्रयोगांच्या मुळाशी जात सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांचे अवलोकन केले तर असे दिसेल की, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्दोषांमुळेच हे गुन्हे घडतात. आपल्या संस्कृतीत आदिकाळापासून या दोषांना ‘षडरिपू’ म्हणजे माणसाचे सहा शत्रू मानले आहे. आपल्या समाजात घडणारा कोणत्याही प्रकारचा गुन्हा विचारात घेतला, तरी त्यामागे या सहापैकी एक कारण नक्की असते. कधी कधी यातील दोन किंवा तीन कारणे एकत्र येऊन ते गुन्ह्याचे निमित्त बनल्याचे दिसते. त्यामुळे आपल्यातील या सहा दोषांवर नियंत्रण आणणे म्हणजेच गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे होय.

न्यूरॉलॉजी (मज्जातंतूशास्त्र / स्नायुविज्ञान) आपल्या मेंदूच्या सर्वात जुन्या स्तराला ‘रेप्टिलियन’ मेंदू मानते. हा मेंदू सर्व्हायव्हल किंवा जगण्यासाठीचे काम करतो; जसे श्वसन, स्पंदन, संतुलन, खाणे, झोपणे, शरीराची मूळ वाढ, आत्मसुरक्षा इ. यानंतर मेंदूचा जो भाग विकसित झाला, त्याला न्यूरॉलॉजीमध्ये ‘इमोशनल’ किंवा ‘मॅमल’ मेंदू म्हणतात. हा मेंदू आपल्या भावना नियंत्रित करतो. सर्वात नंतर विकसित झालेल्या मेंदूला विचार करणारे किंवा ‘रॅशनल’ मेंदू म्हणतात. हे तिन्ही प्रकारचे मेंदू आपले जगणे संचालित करत असतात.

शरीर सुरक्षा, भावना आणि बुद्धी ही या तिन्ही मेंदूंची कार्ये आहेत. या तिन्ही मेंदूंमध्ये योग्य संतुलन असेल, तर माणूस चांगले आयुष्य जगतो. पण, त्यांच्यात असमतोलपणा आला की सगळी गडबड सुरू होते.

न्यूरॉलॉजीनुसार, भावना प्रबळ झाल्या की बुद्धी काम करत नाही. याचा अर्थ इमोशनल ब्रेन सक्रिय झाला की रॅशनल ब्रेन काम करणे बंद करतो. कारण ज्या मेंदूला ऊर्जेची गरज असते, त्याला तिचा पुरवठा केला जातो. जीवाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, तर इमोशनल ब्रेनही बंद होतो. परिणामी ती व्यक्ती पूर्णपणे भावनाहीन बनते आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी काहीही करायला तयार होते. या शास्त्राप्रमाणे विचार केल्यास असे दिसून येते की, सर्व प्रकारचे गुन्हे भावनेच्या अधिक प्राबल्यामुळे घडतात.

सद्सद्विवेकबुद्धी काम करत नाही, मेंदूला योग्य काय, अयोग्य काय, हे ठरवणे कठीण होते आणि माणसाच्या हातून गुन्हा घडतो. उर्दूमधील एक शेर फार सुंदर आहे…

कुछ ऐसे भी मंजर हैं,

तारीख़ के पन्नों में।

लम्हों ने खता की और

सदियों ने सजा पायी।।

लम्हा अर्थात् क्षण. भावनेच्या भरात क्षणात गुन्हा घडून जातो आणि भावना शांत झाल्यावर माणसाला पश्चाताप होतो. पोलिस दलात काम करताना अशा अनेक घटना अनुभवायला येतात की, ज्यामध्ये एखादा माणूस मुळात चांगला असूनही त्याच्या हातून गुन्हा घडलाय आणि नंतर तो पश्चात्ताप करतो आहे. महाराष्ट्राच्या कारागृह विभागाचा प्रमुख असताना मी या विषयाचा सखोल अभ्यास केला. गुन्हे घडण्यामागे सगळा खेळ भावनेचा आहे, हेच त्यातून दिसून आले.

जगातील अनेक प्रगत देशांमध्ये पोलिस फक्त गुन्ह्यांचा तपासच करत नाहीत, तर हे गुन्हे का घडले, यावर मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांसोबत चर्चा करुन त्यावर गंभीरपणे अभ्यास करतात. त्या आधारे तिथले सरकार गुन्हे नियंत्रणाबाबत पुढची पावले उचलते. आपल्याकडे मानसिक आणि सामाजिक अभ्यासाची अशी पद्धत नाही. गुन्ह्यांचा फक्त तपास होतो आणि त्याप्रमाणे न्यायालयात अहवाल पाठवले जातात.

आपले तिन्ही प्रकारचे मेंदू कसे समतोलपणाने आणि मिळून काम करतील, याविषयी प्रत्येकाने थोडा विचार करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आधी आपल्या शिक्षणामध्ये बदल होणे आवश्यक आहे. शिक्षण हे फक्त पोट भरण्याचे माध्यम नाही, तर भावनांच्या संतुलनाचे आणि विवेकबुद्धीच्या जागरणाचेही ते साधन आहे, ही जाणीव शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. हे शिक्षण हातासोबतच हृदय आणि मेंदूलाही बळकट करणारे असावे. हातामुळे रोजगार मिळेल, हृदयाने आपुलकी व प्रेम वाढेल आणि मेंदूने वैचारिक शक्ती उत्पन्न होईल. असा समतोल साधला गेला की माणूस गुन्हा करणार नाही. अनेक प्रयोगातून असे दिसून आले आहे की, ध्यानधारणेमुळे असा समतोल साधला जातो आणि भावनांच्या प्राबल्यामध्येही आपला तोल जात नाही. त्यामुळे जगातील अनेक मोठ्या तुरुंगांमध्ये ध्यानधारणेचा प्रयोग करण्यात आला.

त्यातून असे दिसून आले की, या साधनेमुळे माणूस शांत होतो, त्याची विवेक शक्ती वाढते आणि तो भावनिकदृष्ट्या खूप सुधारतो. बिहार स्कूल ऑफ योगाने भारतात आणि परदेशातही या संदर्भात खूप यशस्वी प्रयोग केले आहेत. लहानपणापासून मुलांना ध्यान शिकवणे आवश्यक आहे. ध्यानधारणा ही ताणतणाव दूर करतानाच आंतरिक आनंद जागा करते. त्यामुळे माणूस गुन्हेगार बनत नाही. काही तज्ज्ञ म्हणतात की, माणूस आतून अतृप्त आणि रिक्त असेल, तर तो ही कमतरता दूर करण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबतो. मद्यपान, अमली पदार्थसेवन आणि इतर विकृत गोष्टी यामुळेच घडत असतात. खरे तर, गुन्हेनियंत्रण हे एक व्यापक आणि एका अर्थाने बहुआयामी काम आहे. त्यासाठी सरकार आणि पोलिस दलाने मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, योगतज्ज्ञ आणि सामाजिक संघटना आदी सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे.

(संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)



Source link