कराड_खूनप्रकरण : सीसीटीव्ही फुटेज लपवल्याचा संशय; डॉक्टर व रुग्णालयाविरोधात कारवाईची तयारी

0
5
कराड_खूनप्रकरण : सीसीटीव्ही फुटेज लपवल्याचा संशय; डॉक्टर व रुग्णालयाविरोधात कारवाईची तयारी

कराड_खूनप्रकरण : सीसीटीव्ही फुटेज लपवल्याचा संशय; डॉक्टर व रुग्णालयाविरोधात कारवाईची तयारी

कराड प्रतिनिधी :- जलसंपदा विभागाचे अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या खूनप्रकरणातील तपासात महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागले असून, संपूर्ण घटना एका खासगी रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या घटनेचे सुमारे १५ मिनिटांचे फुटेज पोलिसांनी जप्त केले असून त्यामध्ये खून कशा पद्धतीने करण्यात आला, याचे स्पष्ट चित्रण असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मण मंडले यांना प्रथम वाहनाने धडक देण्यात आली. त्यानंतर त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला आणि पुन्हा वाहन अंगावर घालून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार संबंधित रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
तपासादरम्यान हे फुटेज संबंधितांकडून लपविण्याचा प्रयत्न झाल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर, गंभीर जखमी अवस्थेत मंडले हे काही काळ रुग्णालयासमोर मदतीसाठी तडफडत असताना देखील त्यांना तातडीची वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप समोर आला आहे.
या प्रकरणात वैद्यकीय नैतिकता आणि कायदेशीर जबाबदारीचे उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला असून, संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाविरोधात वैद्यकीय कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक तसेच मेडिकल कौन्सिलकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांनी दिली.
दरम्यान, प्रेमसंबंधातील वादातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, आरोपी प्रथमेश थोरात (वय २५, रा. कार्वे) आणि आकाश होनसुरे (वय २३) यांना पोलिसांनी अटक केली आहे. मंडले यांच्या पत्नीनेच सुपारी दिल्याचा धक्कादायक आरोपही तपासातून समोर आला आहे.
या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज आता तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरत असून, त्याच्या आधारे पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.