
अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, काही लोकांनी नवीन प्रश्न उपस्थितीत केले, टीका-टिपण्णी केली. ज्या लोकांनी पक्ष सोडला किंवा पक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांकडून आज तुमच्या-माझ्यावर टीका केली जात आहे. मात्र त्याचा फारसा विचार करण्याचं कारण नाही. हे लोक जेव्हा लोकांमध्ये जातील तेव्हा जनताच यांना प्रश्न विचारणार आहे. याची कल्पना असल्याने लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी अशी टीका आपल्यावर केली जात आहे. सत्ता येते आणि सत्ता जाते, मात्र सत्ता गेल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्याची भूमिका घेतली तर सामान्य माणसाचा पाठिंबा आपल्याला मिळतो. मात्र सत्ता गेल्यानंतर जे अन्य ठिकाणी जातात, त्यांच्याबद्दल लोकांना आस्था नसते, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला आहे.






