माझ्या हिश्श्याचे किस्से: जेव्हा फक्त दीड मिनिटाची कहाणी ऐकून अमिताभ यांनी सिनेमाला होकार दिला

0
13
माझ्या हिश्श्याचे किस्से: जेव्हा फक्त दीड मिनिटाची कहाणी ऐकून अमिताभ यांनी सिनेमाला होकार दिला


​​​​​​​रूमी जाफरी6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘बड़े मियाँ छोटे मियाँ’मधील एका दृश्यात अमिताभ बच्चन आणि गोविंदा. 

मी सांगायला सुरुवात केली, ‘सर, तुम्ही आणि गोविंदा दोघेही यूपीचे रहिवासी असून चोर आहात. हे दोघे मुंबईला येतात आणि इथं त्यांच्यासारखेच दिसणारे अमिताभ बच्चन आणि गोविंदा पोलिस आहेत.’ अमितजी थोडा वेळ थांबले, विचार केला आणि म्हणाले, ‘पुढं काय?’ मी म्हणालो, ‘बस्स, इतकंच आहे..’

मागच्या या आठवड्यातील माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबद्दल बोललो होतो आणि आज मी तुम्हाला शतकातील महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगणार आहे. मी त्यांच्याबद्दल लिहिलं नाही तर माझे लेखन अपूर्ण राहील. लेखन तर सोडाच, माझ्या आयुष्याची कहाणीच अधुरी राहील. मला अमितजींसोबत चार चित्रपटांच्या कथा लिहिण्याची आणि दोन चित्रपटांचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

माझ्या “बीवी नंबर वन’ या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. पण, आजच्या किश्श्याची सुरुवात मला प्रारंभापासूनच करायची आहे. म्हणजेच अमितजींसोबतचा माझा पहिला चित्रपट “बड़े मियाँ छोटे मियाँ’पासून. तो काळ असा होता की, इंडस्ट्रीतील लोकांचा डेव्हिड साहेबांवर आणि माझ्यावर एवढा विश्वास होता की, ते चित्रपटाची कथा, भूमिका न ऐकताच होकार देत असत. चित्रपटाचे प्लॅनिंग तयार असायचे. आपले मित्र किरीट त्रिवेदी आणि शीतल जैन यांच्यासाठी एक चित्रपट करायचा, असे अमितजींनी ठरवले तेव्हा त्यांनी गोविंदा आणि डेव्हिड साहेबांशी संपर्क साधला. मला साइन केले आणि सेंटॉर हॉटेलमध्ये एक रूम बुक केली. त्या वेळी मी हॉटेलमध्ये बसून लिहायचो. मी रिसर्च केली आणि लिहायला बसलो. विचार केला की, अमितजींसोबत काम करण्याची संधी मिळालीय, तर आपली स्क्रिप्ट सर्वात वेगळी, नवी आणि सुपरहिट असावी. अमितजींनी कोणकोणत्या भूमिका केल्या आहेत, कोणत्या प्रकारच्या कथा साकारल्या आहेत? काय केलेय अन् काय नाही केले? आणि प्रेक्षकांना आता त्यांना कोणत्या भूमिकेत पाहायला आवडेेल? कोणते पात्र बघायला मजा येईल? हा विचार करताना जाणवले की, अमितजी आणि गोविंदा या दोघांचा एकत्र अभिनय हे या चित्रपटातील सर्वात मोठे आकर्षण असेल. त्यांचा अभिनय पाहून आणि त्यांना एकत्र पाहून लोकांना मजा येईल. लोकांसाठी हे खूप रंजक असेल. त्यामुळे त्यांना दुहेरी भूमिका का देऊ नये, असे वाटले. त्यासाठी काय करावे, काेणती पात्रे निर्माण करावी? मग वाटले की, दोन चोर आणि दोन पोलिस असतील तर मजा येईल. दोन चोर आणि त्यांच्यासारखेच दिसणारे दोन पोलिस.

यावर विचार करता करता २०-२५ दिवस असेच निघून गेले आणि कथानक सांगण्याची वेळ आली. अमितजी अतिशय ऑर्गनाइज्ड व्यक्ती आहेत हे सर्वांना माहीत आहे. त्यांना संपूर्ण स्क्रिप्ट ऐकण्याची सवय आहे. असो. वेळ ठरली आणि कथानक ऐकवण्यासाठी मी कमालिस्तान स्टुडिओत पोहोचलो. ते ‘लाल बादशहा’चे चित्रीकरण करत होते. तिथे पोहोचल्यावर आम्ही गप्पा मारल्या, चहापाणी झाले आणि त्यानंतर अमितजींनी त्यांचा सहायक प्रवीणला सांगितले की, प्रवीण, आता कुणालाही आत येऊ द्यायचे नाही. कोणताही व्यत्यय नकोय. खूप गांभीर्याने मला म्हणाले, “रूमी, ऐकव..’ मी कोणतेही कथानक किंवा स्क्रिप्ट लिहिलीच नव्हती. मी सांगायला सुरुवात केली, ‘सर, तुम्ही आणि गोविंदा दोघेही यूपीचे रहिवासी असून चोर आहात. दोघे मुंबईला येतात आणि इथं त्यांच्यासारखेच दिसणारे अमिताभ बच्चन आणि गोविंदा पोलिस आहेत.’

अमितजी थोडा वेळ थांबले, विचार केला आणि म्हणाले,“पुढं काय?’ मी म्हणालो, “बस्स, इतकंच आहे..’ आणि लगेच विषय बदलून म्हणालो, “सर, तुम्ही याचे टीझर ऐका.’ एका गावातील एक माणूस सायकलवर दोन पोस्टर लावून, मधोमध बसून सायकल चालवतो आहे. दोन्ही बाजूला दोन पोस्टर आहेत. एका बाजूला तुम्ही आणि गोविंदा धोतर-कुर्त्यामध्ये आणि दुस‍ऱ्या बाजूला दोघे पोलिसांच्या गणवेशात आहेत. सायकलवाला ओरडत निघाला आहे, अमिताभ घ्या, गोविंदा घ्या, एका तिकिटात दोन-दोन घ्या. एवढं बोलून मी गप्प बसलो. काही सेकंदांच्या शांततेनंतर त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, “रूमी, मी इंडस्ट्रीत आलो तेव्हापासून पहिल्यांदाच असे घडलेय की, स्क्रिप्ट केवळ दीड मिनिटात संपलीय.’ नंतर त्यांनी हसून होकार दिला आणि म्हणाले, ‘पुढचं कधी ऐकवशील?’ मी म्हणालो ‘सर, पूर्ण होताच ऐकवेन. आणि चित्रीकरणाच्या आधीच ऐकवेन.’

हा होता त्यांचा विश्वास, त्यांचा स्नेह आणि प्रेम. ईश्वराने मला त्यांच्या या विश्वासाला पात्र ठरवले. हा चित्रपट हिट झाला, तो आजही लोकांच्या लक्षात आहे. अमितजींचे तेच प्रेम अाजही तसेच कायम आहे. अदिल जैदींचा शेर आहे…

एहसान-ए-रब मोहब्बतें

इतनी मिलीं ‘अदील’

इस उम्र-ए-मुख़्तसर में

न लौटा सकेंगे हम।

अमितजी केवळ महान कलाकार आणि शतकातील एक महान नायक तर आहेतच, पण ते खूप चांगले माणूस आहेत. मी भाग्यवान आहे की, मला त्यांच्यासोबत काम करायला मिळाले. आज मी हा लेख यासाठी लिहिला, कारण उद्या १६ ऑक्टोबरला ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’ प्रदर्शित होऊन २५ वर्षे पूर्ण होतील. चार दिवसांपूर्वीच अमितजींचा वाढदिवस होता. त्यांनी हजारो वर्षे जगावे, त्यांना निरामय आयुष्य लाभावे, जेणेकरून येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्यांच्यासोबत काम करता येईल हीच माझी मनापासून प्रार्थना आहे. माझ्या “चेहरे’ चित्रपटातील मी लिहिलेले आणि अमितजींनी ज्याला आवाज दिला आहे ते गाणे ऐका…

उम्र की रफ़्तार वक़्त की

मार सहेंगे चेहरे

जिस्म चले जायेंगे पर

ज़िंदा रहेंगे चेहरे।।

स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.



Source link