
प्रवीण दशरथ बांदेकर4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आज चिन्हांची नवी भाषा जन्माला येऊ लागली आहे. शब्दही नाहीत, नुसतीच चिन्हं. कशाला हवीय भाषा? जगण्यातच इतकं कोरडेपण आलंय, सगळ्या उत्स्फूर्त भावना संपून गेल्यात, नैसर्गिकता करपून गेलीय की सखोल आशय व्यक्त करणारे शब्द गरजेचे वाटत नाहीत. अर्थाच्या छटा दाखवणाऱ्या प्रतिमांची किंमत शून्य होऊन गेलीय. गेल्या शतकभरात तर आपल्या भाषेत नव्या म्हणी, वाक्प्रचार बहुधा निर्माणच झालेले नाहीत. जे आहेत, तेही झपाट्याने विस्मरणात जाताहेत.
म्हातारी काशीबाई म्हणाली, ‘घोपान नाय उरला आता… नाय तं मेल्यांका माती नाय चाटूक लावलंय असतंय, तर नाय सांगनार हुतंय. पण म्हंतत तसलां झालांसां आता, आपलाच नेसान नाय जाग्यावर तर दुनिया मारतलीच ना फाट्यावर?’
म्हातारीचं बोलणं ऐकत असताना मी एकदम चमकलो. बोलता बोलता अगदी सहजपणे अशा असंख्य म्हणी वापरायची तिची सवय मला माहीत होती. खेड्यापाड्यातल्या माणसांनी- विशेषतः बायांनी त्यांच्या बोलाचालीतून आपली बोलीभाषा जगवली आहे. त्यांनी वापरलेल्या बोलीला जवळ जातील असे अर्थवाही, चपखल बसणारे शब्द, वाक्प्रचार वा म्हणी अनेकदा प्रमाण भाषेत सापडतही नाहीत. आता हेच बघा ना.. म्हाताऱ्या काशीबाईने बोलता बोलता वापरलेला ‘घोपान’ हा शब्द मी लहानपणी कधी तरी ऐकलेला होता. प्रमाण मराठीत त्याच्या अर्थाच्या जवळ जाणारा प्रतिशब्द शोधायचं म्हटलं, तर नक्कीच कठीण आहे. काळामुळं, वाढत्या वयामुळं, आजारपणामुळं अंगातली शक्ती कमी होत जाते, उत्साह मावळतो, ऊर्जा संपत जाते. एका मागोमाग एक ओढवलेल्या संकटांमुळं, देहामनाचं चैतन्य संपवून टाकणाऱ्या भीषण परिस्थितीमुळंही माणूस उमेद गमावून बसतो. अशा वेळी आता माझ्यात ‘घोपान’ राह्यलं नाही म्हणतात. काय नेमका प्रतिशब्द सांगणार ‘घोपान’ला? ताकद, उत्साह, खुमखुमी, रग हे प्रमाण भाषेतले सगळे शब्द एकांगी आणि थिटे वाटू लागतात. ‘घोपान’ या बोलीतल्या एका शब्दात सामावलेल्या किती तरी अर्थच्छटा प्रमाण मराठीत उपलब्ध असलेल्या यातल्या एकाही शब्दांत सामावलेल्या नाहीत, हे सहज लक्षात येतं. म्हाताऱ्या काशीबाईसारख्या स्त्रियांच्या बोलण्यातले किती तरी आशयघन शब्द आज वापरातून दूर जातायत. किती तरी अर्थपूर्ण म्हणी आणि वाक्प्रचार काळाच्या पोटात ढकलले जात लुप्त होत चाललेत. नव्या पिढीला तर त्यातले अनेक शब्द वा म्हणी माहीत असण्याचीही शक्यता नव्हती.
काशीबाईसारख्या खेड्यांतल्या अभावग्रस्त जिण्याला पिढ्यान् पिढ्या कवटाळलेल्या बायाबापड्यांच्या जगण्याचा विचार करताना मला वाटतं, भाषेचं प्रवाहीपण आणि समृद्धी या अशा जगण्यामुळंही टिकली असावी. या लोकांच्या जगण्यातले रोजमर्रा संघर्ष, नैतिक-अनैतिकतेचा बाऊ न करता उघडंवाघडं, मोकळंढाकळं, बिनधास्त जगणं, मनातल्या सगळ्या दुःखाचा, वेदनांचा, त्रासांचा, कष्टांचा निचरा व्हावा म्हणून मुक्तपणे दिलेल्या शिव्या, पांढरपेशा लोकांच्या दृष्टिकोनातून अपशब्द मानले जातील असे शब्द बेधडक वापरणं, हे सगळं जसंच्या तसं त्यांच्या बोलभाषेतही उतरलं असावं. मुळात जगण्यातच फापटपसारा नसल्यानं भाषेतही तो येत नाही. त्यामुळंच नेमकेपणाने आणि थेटपणे अर्थ पोचेल अशा म्हणी, शिव्या आणि वाक्प्रचार निर्माण झाले असावेत, ते टिकूनही राहिले असावेत. अनेक अर्थच्छटा सामावून घेणारे शब्द यातूनच येत असावेत.
काशीबाईच्या जगण्याचा विचार करताना मला हे अधिकच प्रकर्षानं जाणवतं आहे. अर्थात, काशीबाई फक्त निमित्तमात्र आणि प्रातिनिधिक उदाहरण. अशा किती तरी स्त्रिया सबंध देशभरात कुठल्याही खेड्यांतून सापडू शकतात. काशीबाईच्या दरिद्री कुळवाडी बापाला सहा-सात मुली. एकेकीला उजवताना फार चिकित्सा करीत बसणं परवडणारं नव्हतं. जिच्या जे नशिबात असेल, तसं तिला स्थळ मिळेल, तसा तिचा संसार होईल, हीच पूर्वापार चालत आलेली धारणा. त्यामुळंच की काय, काशीबाईला सांगून आलेलं दूरच्या नात्यातलं स्थळ फारसा विचार न करताच स्वीकारलं गेलं. लग्न झालं नि वर्षभरातच काशीबाई माहेरी परतली. सासरच्यांचं म्हणणं होतं, ही भयंकर फटकळ आहे, नवऱ्याला, सासूला, सासऱ्याला किंमत देत नाही. नणंदांना पुढची उत्तरं देते. हिच्या जिभेला काही हाड नाही. अशा पोरीला कसं नांदवायचं रितीभाती असलेल्या आमच्या घरात? काशीबाईचं म्हणणं होतं, नवरा अगदीच बावळा आहे. आईबाप नि बहिणींच्या पुढे जायची हिंमतच नाही त्याच्यात. तो काय माझी कूस उजवणार नि जन्मभर मला पोसणार?
पण, माहेरी येऊन तरी ती काय करणार होती? बापाच्या फाटक्या संसारात हिला आता काय स्थान उरलं होतं? तरीही काशीबाईनं आपणच आपला मार्ग शोधून काढला. बापाची डोंगरात थोडी पडिक जागा होती. तिथं झोपडी बांधून भुतासारखी ती वावरत राहिली. झाडपाल्याची औषधं, मध, कंदमुळं वगैरेची तिला कशी कोण जाणे, माहिती होती. ती वैदू बनून औषधं द्यायला लागली. तिला हातगुण आहे, असं लोक बोलू लागले. जोडीला सुईणपणही करत होती. गावातल्या दोन अनाथ पोरांनाही तिनं आपल्यात सामावून घेतलं. त्यांनाही कोंड्याचा मांडा करून वाढवायला सुरुवात केली. जमेल तशी गावाला, गावगुंडांच्या भुकांना, जनावरांच्या बुभुक्षित नजरांना फटकारत आपल्या मर्जीवर जगत राहिली. काशीबाईला तिची भाषा तिच्या या जगण्यातूनच सापडली असावी का? तिचा तोंडाळपणा हेच तिचं हत्यार होतं. तिच्या शिव्यांना, बोलभांडपणाला भले भले लोक टरकून असत. तिच्या तोंडाला कोण लागेल, ती बोलून नागवं करेल, इज्जतीचा कचरा करेल, असंच त्यांना वाटायचं. त्यात अर्थात तथ्यही होतं. तिच्या भाषेनंच तिच्याभोवती सुरक्षेचं कवच निर्माण केलं असावं.
कुठल्याही भाषेतलं अर्थवाही संचित नष्ट होत जाण्यामागं जी काही वेगवेगळी सामाजिक कारणं असतील ती असोत, पण काशीबाईसारख्यांच्या जगण्याचा विचार करताना मला नेहमी वाटतं की, माणूस जितका जास्त सुरक्षित जगणं जगू लागतो, तितका त्याच्या भाषेचा जास्त संकोच होत जात असावा. आधुनिक होत जाण्याशी, भौतिकवादी वा चंगळवादी होत जाण्याशी याचा संबंध नाही, असे म्हणता येत नाही. पण त्याहीपेक्षा माणसाच्या जगण्यातील पेच कमी होत गेले, स्वास्थ्य, स्थैर्य येत गेलं की मर्यादित भाषा वापरली तरी चालत असावी. त्यातूनच आज कदाचित चिन्हांची नवी भाषा जन्माला येऊ लागली आहे. शब्दही नाहीत, नुसतीच चिन्हं. कशाला हवीय भाषा? जगण्यातच इतकं कोरडेपण आलंय, सगळ्या उत्स्फूर्त भावना संपून गेल्यात, नैसर्गिकता करपून गेलीय की, आता सखोल आशय व्यक्त करणारे शब्द गरजेचे वाटत नाहीत. अर्थाच्या वेगवेगळ्या छटा दाखवणाऱ्या प्रतिमांची किंमत शून्य होऊन गेलीय. गेल्या शतकभरात तर आपल्या भाषेत नव्या म्हणी, वाक्प्रचार बहुधा निर्माणच झालेले नाहीत. आहेत, तेही झपाट्याने विस्मरणात जाताहेत. कोण, कुठं वापरताहेत म्हणी नि वाक्प्रचार वगैरे?
नव्या स्वास्थप्रिय, सुखासीन जगण्यामुळं नवे शब्द घडवायचीही गरज आता संपून गेली आहे. ज्ञानोबा-तुकोबांसारख्या महाकवींनी आपल्या या मायबोलीमध्ये कळत-नकळत किती काय काय पेरलं होतं, रुजवलं होतं. पण, भाषेचा डोळ्यांदेखत होत जाणारा ऱ्हास पाहताना आता ते सगळंच संचित हळूहळू संपून जाईल, असंच मनात येत राहतं. काशीबाईशी बोलत असताना या विचारांनी उगाचच उदास वाटत राहिलं होतं.
मग थोडं इकडचं तिकडं बोलून मी उठलो नि घरी आलो. खळ्याच्या पेळेपाशी उभा राहून पायांवर पाणी घेत होतो. इतक्यात माझ्याकडं बघत आई म्हणाली, ‘काशीबायक भेटान् इलंस ना? काय नाय मराची ती म्हातारी इतक्यात. मराच्या आधीच मरान गेलीहां ती सगळ्या गावाच्या तेराव्याचे वडे खाव्न…’
पुन्हा चमकलो. ही तर थेट तुकोबांचीच ओळ आईच्या बोलण्यातून प्रकटली होती. मरण माझे मरोन गेले, मज केले अमर… क्षणात मनात आलं, खेड्यापाड्यांत माणसं जगतायत तोवर तरी ज्ञानोबा-तुकोबांच्या या भाषेचं ‘घोपान’ नक्कीच शाबूत राहील!
(संपर्कः samwadpravin@gmail.com)





