गोष्ट सांगतो ऐका…: आशीर्वाद

0
15
गोष्ट सांगतो ऐका…: आशीर्वाद


अरविंद जगताप2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एकूणच पैसा हा विषय आता नगरसेवकाला कुणाच्याच तोंडून ऐकायचा नव्हता. त्यात आई रडता रडता दहा वेळा पैशाला आग लावण्याची भाषा करत होती. त्याचा त्याला आणखीनच वैताग येत होता. अचानक नगरसेवक उठला. दोन मिनिट.. असा पोलिसांना इशारा करून त्यानं दार बंद केलं. पुन्हा आईपाशी जाऊन बसला. आईला हळू आवाजात बोलू लागला. त्याची दोन – चार वाक्यं ऐकून आई अचानक शांत झाली. गंभीरपणानं त्याचं ऐकू लागली…

नगरसेवकाच्या घराबाहेर नेहमीपेक्षा जास्त गर्दी जमलेली दिसत होती. नगरसेवक निवडून आला त्यादिवशी जमली होती तशीच गर्दी. फक्त निवडून आल्यादिवशी उत्साह होता, घोषणा होत्या. गुलाल होता. आता मात्र जमलेले सगळे चिंतेत होते. काही निराश होते. काही आनंदात होते, पण बळेच आनंद लपवताना दिसत होते. काही फक्त गर्दी का जमलीय, म्हणून गर्दी करत होते. अजून बाहेरच्या लोकांना नेमकी वेळ कळत नव्हती, पण बातमी पक्की होती.

नगरसेवकाला अटक होणार. भ्रष्टाचार उघडकीला आल्यामुळं नगरसेवकाला अटक करायला आले होते. साधासुधा नाही. कितीतरी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होता. आणखीही काही लोक सामील होते. पण, नगरसेवकाकडं पंचवीस कोटी सापडले होते. कुठून आले? कसे आले? काही पत्ता नव्हता. लोक घराबाहेर वाट बघत होते. काही लोकांना अजूनही विश्वास होता की नगरसेवक वर कुणाला तरी फोन करून अटक टाळणार. खरं तर अर्धा तास होऊन गेला होता गर्दी जमून. उशीर होत होता. ऊन वाढत होतं. पण, लोकांना तो क्षण चुकवायचा नव्हता.

खूप लोकांना मोबाइलमध्ये व्हिडिओ बनवायचा होता. नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांना, ‘हम तुम्हारे साथ है..’ अशा घोषणा द्यायच्या होत्या. पण, आत काय चालू आहे, ते कळत नव्हतं. नगरसेवकाची बाकी चौकशी झाली होती. त्याला पोलिसांनी सोबत यायला सांगितलं. जाता जाता कुटुंबाची भेट घेणं सुरू होतं. नगरसेवक बायकोला आणि मुलीला भेटला. त्या दोघी रडत होत्या. त्याने बळेच आव आणून त्यांना धीर दिला. आता तो आत आईकडं गेला. आई बेडवर होती. रडत होती. नगरसेवक तिच्यापाशी बसला. गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यामुळं तिला उठता येत नव्हतं. तो तिला कसं समजून सांगायचं, याचा विचार करत होता. आईचं रडणं थांबायला तयार नव्हतं. नगरसेवक काही वेळ तसाच बसून राहिला. पण, आई काही रडायची थांबत नव्हती. पोलिस पण अस्वस्थ झाले होते. नगरसेवकालाही वैताग आला होता. एकतर तो दरम्यान दोनदा आईच्या पाया पडला होता, पण त्याला आशीर्वाद द्यायचंही तिला भान नव्हतं. त्यातच ती रडता रडता.. ‘आग लावा त्या पैशाला, मला माझा पोरगा जवळ पाहिजे..’ असं काय काय बोलत होती. एकूणच पैसा हा विषय आता नगरसेवकाला कुणाच्याच तोंडून ऐकायचा नव्हता. त्यात आई रडता रडता दहा वेळा पैशाला आग लावण्याची भाषा करत होती. त्याचा त्याला आणखीनच वैताग येत होता. बाहेर आईच्या रडण्याचा जोरजोरात आवाज ऐकून पोलिसांनाही जरा दयाच येत होती. पण, दया दाखवण्याची काहीच सोय नव्हती.

अचानक नगरसेवक उठला. दोन मिनिट.. असा पोलिसांना इशारा करून त्यानं दार बंद केलं. पुन्हा आईपाशी जाऊन बसला. आईला हळू आवाजात बोलू लागला. त्याचे दोन – चार वाक्यं ऐकून आई अचानक शांत झाली. गंभीरपणानं त्याचं ऐकू लागली.

नगरसेवक तिला लहानपणीची एक गोष्ट सांगत होता. त्याच्या लहानपणीची. एक दिवस आई अशीच जोरजोरात रडत होती. हा तेव्हा पाच वर्षांचा असेल. त्याला सगळे बंटी म्हणायचे लहानपणी. आई त्याला दवाखान्यात घेऊन जायचं म्हणून रडत होती. ओरडत होती. त्याला कसाबसा उचलायचा प्रयत्न करत होती. पण, बंटी मोठमोठ्यानं रडत होता. हात-पाय आपटत होता. जमिनीवर लोळत होता. आवाज ऐकून शेजारपाजारचे लोक आले. एकाने रिक्षा केली आणि लहान बंटीला उचलून घेतलं. आईनं बंटीच्या वडिलांना निरोप पाठवला होता. रिक्षा दवाखान्यात पोचली. बंटीचे वडील थेट दवाखान्यात पोचले. ते पण घाबरले होते. डॉक्टर बंटीला तपासत होते. आई-बापाच्या जीवाची धाकधूक वाढत होती. त्यात डॉक्टरचा चेहरा एवढा निर्विकार होता की, दोघांनाही काहीच अंदाज लावता येत नव्हता. गल्लीतले दोन लोक सोबत आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर असलेले गंभीर भाव या दोघांची चिंता वाढवत होते.

बंटीच्या आई – वडिलांच्या प्रश्नांना वैतागून डॉक्टरने त्यांना दहा मिनिट बाहेर बसायला सांगितलं. खरं तर डॉक्टरांना शांतता हवी होती. पण, त्यांनी बाहेर बसायला सांगितल्यामुळं आई -वडील आणखी घाबरले. त्यात आई सारखी.. ‘माझं मंगळसूत्र विका, बांगड्या विका, पण बंटीला बरं करा..’ म्हणत होती. बंटीचे वडील ‘नाही, नाही’ म्हणत होते. बंटीच्या वडिलांचा त्याला बरं करायला किंवा त्याच्यावर उपचार करायला विरोध आहे, असं बाकी लोकांना वाटत होतं. त्यांना फक्त बायकोचं सोनं विकायची गरज पडणार नाही, असं म्हणायचं होतं. त्यात सल्ले देणारे आजूबाजूला होतेच. म्हणजे ते लोक स्वतः उपचार घ्यायलाच दवाखान्यात आले होते. पण, सल्ले असे देत होते की, स्वतःच डॉक्टर आहेत.

डॉक्टरांनी बंटीच्या आई -वडिलांना आत बोलवलं. काळजी करायचं काही कारण नाही, असं सांगितलं. औषध लिहून दिलं. ऑपरेशन वगैरे काही करायची गरज नाही म्हणाले. पण आई बळेच ऑपरेशनची गरज पडली तर सांगा, असं म्हणत होती. डॉक्टरांना हसू आलं. दोघांनी पहिल्यांदा डॉक्टरना हसताना पाहिलं. बरं वाटलं जरा दोघांना. आई -वडील बंटीला घेऊन घरी गेले. आता ते एवढ्या लोकांकडून उपाय ऐकून ऐकून जरा शांत झाले होते. आत्मविश्वास वाढला होता. आई बंटीला म्हणत होती.. ‘पैसे कुठं जात नाहीत. सकाळी शी केली की पडतील बाहेर..’ तर, बंटीनं आठ आणे गिळले होते खेळता खेळता. आई आठ आणे कुठं गेले म्हणून रागवेल, याची भीती वाटली आणि बंटीने सकाळी भोंगा पसरला होता. तो एवढा मोठ्यानं रडायला लागला की, आईनं हिशेब विचारायचा विषयच आला नाही. उलट ती बंटीला बरं करायला आपल्या अंगावरच्या थोड्याफार सोन्याचा हिशेब करू लागली. बंटी मध्येच रडायचा. आई त्याला केळी खायला द्यायची. खूप लोकांनी सांगितलं होतं की केळी खायला द्या, पटकन् पोट साफ होतं अन् पैसे पण बाहेर पडतात. पण, तो दिवस आणि ती रात्र बंटीला शी झाली नाही. खूप प्रयत्न केले. म्हणजे बंटीला शी व्हावी म्हणून दहा-पंधरा लोकांनी प्रयत्न केले. पण नाही. आई – वडील रात्रभर जागे होते. बंटी ढाराढूर झोपला होता. आईला कधीच वाटलं नव्हतं की, पोराचं पोट साफ व्हावं म्हणून देवाला हात जोडायची वेळ येईल. पण, तिनं बिचारीनं ते सुद्धा केलं. शेवटी सकाळी बंटीने शी केली. आठ आणे याचि देही, याचि डोळा पाहिल्यावर आई – वडिलांचा जीव भांड्यात पडला.

नगरसेवक झालेल्या, करोडो रुपये कमवलेल्या बंटीने या गोष्टीची आईला आठवण करून दिली. आईला म्हणाला, ‘मी फक्त चुकून पन्नास पैसे गिळले होते, तर रात्रभर जागी होतीस. रडत होतीस. आता नगरसेवक झाल्यापासून पन्नास लाख खात होतो, तरी कधी विचारलं का नाहीस गं? कधीच टेन्शन का आलं नाही तुला..?’ आईपाशी उत्तर नव्हतं. नगरसेवक पुन्हा एकदा पाया पडला आणि निघून गेला. आईला एवढं अपराधी वाटत होतं की, आशीर्वाद द्यायला हात वर करायचं भानही तिला उरलं नाही.

(संपर्कः jarvindas30@gmail.com)



Source link