Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रRight to Love’च्या विचारातून उभ्या राहिलेल्या अनहद सोशल फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिन...

Right to Love’च्या विचारातून उभ्या राहिलेल्या अनहद सोशल फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

तीन वर्षांच्या सामाजिक प्रवासात प्रेम, समानता आणि मानवी हक्कांच्या विचारांना बळ; संस्थेशी जोडलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया व शुभेच्छांचे आवाहन

प्रतिनिधी :
प्रेमाचा अधिकार, मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक संवेदनशीलतेच्या विचारातून सुरू झालेल्या अनहद सोशल फाउंडेशनला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने संस्थेच्या कार्यकर्ते, सहकारी, हितचिंतक आणि संस्थेशी विविध माध्यमातून जोडलेल्या नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अनहद सोशल फाउंडेशनच्या तीन वर्षांच्या प्रवासाची सुरुवात केवळ संस्थेच्या स्थापनेपासून झालेली नसून, त्यामागे यापूर्वीपासून सुरू असलेल्या ‘Right to Love’ या उपक्रमाच्या कार्याची भक्कम पार्श्वभूमी आहे. प्रेम हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, या मूलभूत विचारातून सुरू झालेल्या या कामाला अधिक व्यापक, संघटित आणि संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी अनहद सोशल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली.

गेल्या तीन वर्षांच्या काळात संस्थेने सामाजिक प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याचा आणि विविध घटकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रवासात अनेक व्यक्ती, संस्था, सामाजिक कार्यकर्ते, सहकारी आणि हितचिंतक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी झाले.

कधी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून, कधी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन, कधी संस्थेच्या कामाला सहकार्य करून, तर कधी केवळ विश्वास आणि शुभेच्छांच्या माध्यमातून अनेकांनी अनहदच्या प्रवासाला साथ दिली आहे. त्यामुळे संस्थेचा हा तिसरा वर्धापन दिन हा केवळ एका संस्थेच्या स्थापनेचा दिवस नसून, या विचारांशी जोडलेल्या सर्वांच्या सामूहिक प्रवासाचा टप्पा असल्याची भावना व्यक्त होत आहे.

“या प्रवासात तुमच्यापैकी प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी, अनुभव आणि भावना जोडलेल्या आहेत. तुम्ही अनहदच्या कामाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेले असाल, तर तुमची छोटीशी प्रतिक्रिया आणि दोन शब्द नक्की कळवा. तुमचे शब्द आमच्यासाठी मोठे बळ असून पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा देतील,” असे आवाहन अनहद सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

तीन वर्षांच्या या प्रवासात साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे, मित्रपरिवाराचे, हितचिंतकांचे आणि शुभेच्छुकांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले असून, आगामी काळातही सामाजिक बांधिलकी आणि मानवी मूल्यांच्या दिशेने अधिक व्यापक कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

“अनहदच्या या प्रवासात सोबत असल्याबद्दल मनापासून धन्यवाद!” या भावनेने संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले आहे.

– के. अभिजीत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments