
खामगावमध्ये हृदयद्रावक दुर्घटना; विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, महावितरणच्या हलगर्जीपणाचा आरोप
फलटण | प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी (दि. ८ जुलै) सकाळी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेत विजेचा तीव्र धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. घरासमोरील विद्युत केबलच्या उघड्या तारेला स्पर्श झाल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे खामगाव परिसरासह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील एका घरासमोरून जाणाऱ्या विद्युत केबलची तार उघडी असल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबातील एका सदस्याचा या तारेला अचानक स्पर्श झाला आणि त्याला विजेचा तीव्र धक्का बसला. त्याचा आरडाओरडा ऐकून त्याला वाचवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य धावत आले. मात्र, एकामागून एक मदतीसाठी पुढे सरसावलेल्या सदस्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. काही क्षणांतच ही घटना भीषण दुर्घटनेत बदलली आणि चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
- किसोरडे शिंदे
- सचिन शिंदे
- गगाया शिंदे
- अर्चना शिंदे
चारही जण पारधी समाजातील असल्याची माहिती मिळाली आहे. एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातल्याने गावकऱ्यांसह संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवले असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे. तसेच विद्युत यंत्रणेशी संबंधित बाबींचीही चौकशी केली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. परिसरात उघड्या विद्युत तारा आणि धोकादायक केबल्सबाबत वारंवार तक्रारी करूनही योग्य दखल घेतली गेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वेळेत दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या असत्या तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच जिल्ह्यातील सर्व धोकादायक विद्युत तारा व केबल्सची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.










