रुई परिसरात वन विभागाची धडक कारवाई; विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त

0
3
रुई परिसरात वन विभागाची धडक कारवाई; विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त

बारामती | प्रतिनिधी

मौजे रुई गावच्या हद्दीत बारामती-भिगवण मार्गावर वन विभागाने धडक कारवाई करत विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला आहे. या कारवाईत कडूनिंब व जांभूळ प्रजातीच्या वृक्षांचे अंदाजे ८ ते ९ टन लाकूड हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे यांनी दिली.

पारवडी येथील वनरक्षक संतोष जराड व हंगामी रोजंदारी मजुरांच्या पथकाने गस्तीदरम्यान टाटा कंपनीचा पांढऱ्या-क्रीम रंगाचा टेम्पो संशयास्पद स्थितीत आढळून आला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये कडूनिंब व जांभूळ वृक्षांचे विनापरवाना तोडलेले लाकूड वाहतूक परवान्याविना नेले जात असल्याचे उघड झाले.

वन विभागाने तत्काळ कारवाई करत मुद्देमालासह टेम्पो ताब्यात घेतला असून पुढील चौकशीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला आहे. दरम्यान, कारवाईदरम्यान वाहन चालक फरार झाला.

या प्रकरणी वाहन चालक व मालकाविरुद्ध भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत कलम ४१, ४२ व ५२(१) अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, वनपाल एस. आर. उंडे व वनरक्षक संतोष जराड करीत आहेत.

वन विभागाच्या या कारवाईमुळे विनापरवाना वृक्षतोड व लाकूड वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.