अकलूजमध्ये FDAची धडक कारवाई; प्रतिबंधित मावा व्यवसायाचा पर्दाफाश१.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन दुकानगाळे सील; दोघांना अटक

0
9
अकलूजमध्ये FDAची धडक कारवाई; प्रतिबंधित मावा व्यवसायाचा पर्दाफाश१.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन दुकानगाळे सील; दोघांना अटक

अकलूज प्रतिनिधी : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) च्या पथकाने अकलूज येथे पहाटे धडक कारवाई करत प्रतिबंधित मावा निर्मिती व विक्री करणारा अड्डाच उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल १ लाख ९१ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी दोन इलेक्ट्रिक मशीनही प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. संबंधित दोन दुकानगाळे सील करण्यात आले असून याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन, सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी मंगळवारी (दि. २ जून २०२६) सकाळी साडेसातच्या सुमारास अकलूज येथील गांधी चौकातील जुन्या पोलीस स्टेशनसमोरील मे. बाबा पान शॉप येथे छापा टाकला. तपासणीदरम्यान दोन गाळ्यांमध्ये प्रतिबंधित मावा तयार करून त्याची विक्री सुरू असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच मावा निर्मितीसाठी वापरण्यात येणारी दोन इलेक्ट्रिक यंत्रेही प्रशासनाने ताब्यात घेतली. यानंतर संबंधित दोन्ही दुकानगाळे तात्काळ सील करण्यात आले.
या प्रकरणी दुकान मालक हर्षद शिवाजी होनप (वय ३३, रा. अकलूज) आणि सोनू उर्फ तानाजी शिवाजी भोसले (वय ३०, रा. अकलूज, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात भेसळ, गुटखा, मावा आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातील कारवायांना वेग आल्याचे दिसून येत आहे. अकलूजमधील ही धडक कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग मानली जात असून या कारवाईमुळे प्रतिबंधित पदार्थांच्या व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अकलूजसह संपूर्ण माळशिरस तालुक्यात गल्लोगल्ली मावा, पानमसाला आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांची विक्री सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये नेहमीच होत असते. काही ठिकाणी अशा पदार्थांची विक्री उघडपणे होत असल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत. त्यामुळे कारवाई केवळ निवडक ठिकाणांपुरती मर्यादित न राहता तालुक्यातील सर्वच पानटपऱ्या व संबंधित दुकानांची व्यापक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अकलूज, नातेपुते, वेळापूर, माळशिरस आणि परिसरातील प्रमुख गावांमध्ये प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांची माहिती सर्वसामान्य नागरिकांनाही असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने सातत्यपूर्ण मोहीम राबवून अशा व्यवसायांवर कायमस्वरूपी आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यवसायिकांना परवाना घेऊनच व्यवसाय करण्याचे आवाहन केले आहे. तसेच गुटखा, मावा, पानमसाला, सुगंधित तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त सुनिल जिंतूरकर आणि अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी सांगितले.
सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थांच्या पुरवठ्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांना यासंदर्भात तक्रारी असल्यास त्यांनी fdasolapur@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.