तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत दोन्ही विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी
फलटण : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित सन 2026-27 च्या तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धेत कमला निंबकर बालभवन, फलटणच्या दोन विद्यार्थिनींनी बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
कु. श्रेया प्रमोद माने हिने 14 वर्षांखालील मुलींच्या गटातील बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. श्रेया सध्या इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत आहे.
श्रेयाने या स्पर्धेत 6 पैकी 6 डाव जिंकून हे यश संपादन केले.
तसेच कु. प्रज्ञा अन्वय गांधी हिने 17 वर्षांखालील मुलींच्या गटातील बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. प्रज्ञा इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत आहे.
दोन्ही विद्यार्थिनींनी बुद्धिबळासारख्या एकाग्रता, तर्कशक्ती, संयम आणि निर्णयक्षमता विकसित करणाऱ्या खेळात आपल्या बुद्धिमत्तेची व कौशल्याची प्रभावी छाप पाडली. त्यांच्या या यशामुळे कमला निंबकर बालभवनच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्या जाणाऱ्या संधींचेही दर्शन घडते.
या स्पर्धेचे आयोजन सहकारमहर्षी हणमंतराव पवार हायस्कूल, फलटण येथे करण्यात आले होते. श्रेया माने हिला तिचे पालक कमला निंबकर बालभवन चे मुख्य लेखापाल प्रमोद माने यांनी विशेष मार्गदर्शन केले. व श्रेया माने व प्रज्ञा गांधी यांच्या या यशाबद्दल कमला निंबकर बालभवनचे पदाधिकारी,बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
