टीआर-एनटी असा भेद न करता ५०० ते ६०० रुपयांत एकत्रित स्थानिक टोल पास लागू करण्याची ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी
फलटण : फलटण एस.टी. स्टँड हे मध्यबिंदू मानून ६० किलोमीटर परिघातील सर्व विद्यमान तसेच भविष्यात सुरू होणाऱ्या टोल प्लाझांसाठी फलटण तालुक्यातील वाहनधारकांना विशेष सवलतीचा एकत्रित वार्षिक टोल पास लागू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.
फलटण हे सातारा जिल्ह्यातील भौगोलिक, व्यापारी, कृषी, औद्योगिक आणि वाहतूकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. फलटण शहर व तालुक्यातून विविध दिशांना रस्त्यांचे जाळे विकसित होत असून फलटण-पंढरपूर, फलटण-पुणे/जेजुरी, फलटण-इंदापूर/बारामती, फलटण-दहिवडी तसेच फलटण-लोणंद-शिरवळ या मार्गांवरील पायाभूत सुविधांचा विकास सुरू आहे.
या रस्त्यांच्या विकासामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होत असली, तरी रस्ते बांधकामाच्या काळात स्थानिक नागरिकांना अनेक वर्षे वाहतूक कोंडी, धूळ, अपघात, वाहनांचे नुकसान आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागले आहे. आता रस्ते विकसित होत असताना स्थानिक नागरिकांनाच विविध दिशांनी प्रवास करताना टोलचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे ॲड. खरात यांनी निवेदनात म्हटले आहे.
सध्याच्या व्यवस्थेत टोल प्लाझापासून २० किलोमीटर अंतरातील स्थानिक वाहनांसाठी स्वतंत्र पासाची तरतूद आहे. मात्र फलटणसारख्या विस्तृत तालुक्यासाठी प्रत्येक टोल प्लाझाची स्वतंत्र २० किलोमीटरची मर्यादा स्थानिक नागरिकांच्या प्रत्यक्ष प्रवासाच्या गरजा पूर्ण करीत नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक नागरिक स्थानिक असूनही नियमित टोल भरत आहेत.
नोकरी, व्यवसाय, शेतीमालाची वाहतूक तसेच दैनंदिन कामांसाठी तालुक्याबाहेर वारंवार प्रवास करणाऱ्या नागरिकांवर वर्षभरात टोलचा मोठा आर्थिक भार पडतो. त्यामुळे फलटण तालुक्यासाठी स्वतंत्र स्थानिक सवलतीची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ॲड. खरात यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये फलटण एस.टी. स्टँडपासून ६० किलोमीटर परिघातील सर्व संबंधित टोल प्लाझांसाठी ‘फलटण तालुका स्थानिक वार्षिक एकत्रित टोल पास’ सुरू करणे, तो तालुक्यातील सर्व पात्र वाहनधारकांना लागू करणे, तसेच वाहन ट्रान्सपोर्ट (टीआर) किंवा नॉन-ट्रान्सपोर्ट (एनटी) या आधारावर भेदभाव न करणे यांचा समावेश आहे.
या विशेष पासची वार्षिक फी सामान्य नागरिकांना परवडणारी असून ती ५०० ते ६०० रुपयांपेक्षा जास्त नसावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. एकाच फास्टटॅग किंवा डिजिटल प्रणालीद्वारे ६० किलोमीटर परिघातील संबंधित टोल प्लाझांवर सवलत आपोआप लागू व्हावी, तसेच भविष्यात या परिघात सुरू होणारे नवीन टोल प्लाझाही या योजनेत समाविष्ट करावेत, अशी मागणी आहे.
स्थानिक रहिवासी व वाहनांची पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि ऑनलाइन करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
ही मागणी राष्ट्रीय महामार्गावरील सर्वसाधारण टोल धोरणाला विरोध करण्यासाठी नसून, राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाचा प्रत्यक्ष वापर करणाऱ्या आणि त्याचा आर्थिक भार सहन करणाऱ्या स्थानिक नागरिकांना न्याय्य व परवडणारी सवलत मिळावी, या सार्वजनिक हिताच्या उद्देशाने असल्याचे ॲड. कांचनकन्होजा खरात यांनी स्पष्ट केले आहे.
‘राष्ट्रीय महामार्गांचा विकास — स्थानिक नागरिकांवर आर्थिक अन्याय नको’ या भूमिकेतून शासनाने फलटण तालुक्यासाठी स्वतंत्र ६० किलोमीटर स्थानिक परिघ निश्चित करून ५०० ते ६०० रुपये वार्षिक दराचा एकत्रित टोल पास लागू करण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. तसेच खासदार व आमदार यांनी हा प्रश्न लोकसभा व विधानसभेत प्रभावीपणे मांडावा, अशी मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.
फलटण, दि. ९ सप्टेंबर २०२६
