
सातारा, दि. १५ : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी विधान परिषद सभापती व ज्येष्ठ आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री मकरंद पाटील यांनी स्वागत व प्रस्तावना केली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हायड्रोजन इंधन हे देशाचे भविष्य असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जदाता आणि इंधनदाता बनण्याची गरज असून, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
देशात लवकरच १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने उपलब्ध होतील, त्यामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होऊन इंधन आयातीवरील खर्चात मोठी बचत होईल, असेही गडकरी यांनी सांगितले. तसेच पुणे–सातारा प्रवास अवघ्या एका तासात, तर पुणे–छत्रपती संभाजीनगर प्रवास साडेतीन तासांत पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला.
देशातील सर्व प्रमुख रस्ते प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी शेती क्षेत्रात बायो इंधनाचा वापर वाढविण्याची गरज अधोरेखित केली. पाणी संवर्धनावर भर देत “पाणी हीच खरी संपत्ती” असल्याचे सांगत जलसंधारणामुळे शेती अधिक फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बायो इंधनाचा पर्याय सर्वांनी स्वीकारावा, असे आवाहन करताना गडकरी म्हणाले की, लवकरच विमान वाहतूक क्षेत्रातही बायो इंधनाचा वापर सुरू होईल. त्यामुळे भारत इंधन आयात करणारा नव्हे, तर इंधन निर्यात करणारा देश बनेल. तसेच वेस्ट प्लास्टिकपासून रस्ते निर्मितीचा प्रकल्पही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.






