पाटण (सातारा): सातारा जिल्हा हा शौर्य आणि बलिदानाची परंपरा असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच मातीतील आणखी एका सुपुत्राने देशाच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च (Satara News) बलिदान दिले आहे. पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र बाळकृष्ण विलासराव निकम (वय ४२) यांना सिक्कीममधील चीन सीमेवर ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’ अंतर्गत कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. तब्बल २३ वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावल्यानंतर, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांनी मातृभूमीसाठी प्राण अर्पण केले.(Satara News)
कर्तव्य बजावताना काळाचा घाला
शहीद बाळकृष्ण निकम हे भारतीय सैन्यदलात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती सिक्कीम येथील अतिदुर्गम आणि उणे तापमानातील चीन सीमेवर होती. ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’ सारख्या कठीण मोहिमेवर असताना, निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देताना त्यांना वीरमरण आले. ही बातमी शुक्रवारी लष्करी मुख्यालयातून त्यांच्या गावी कळवण्यात आली आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण पाटण तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.(Satara News)
पिंपळोशी गावावर शोककळा
“आपला बाळकृष्ण शहीद झाला,” ही बातमी समजताच पिंपळोशी गावासह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. निकम कुटुंबीयांच्या घरासमोर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. शहीद बाळकृष्ण हे सुट्टीवर आल्यावर गावातील प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत सर्वांशी आपुलकीने आणि मनमोकळेपणाने मिसळायचे. त्यांच्या जाण्याने केवळ एका कुटुंबाचा आधार गेला नाही, तर गावाने आपला एक लाडका सुपुत्र गमावला आहे, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
निकम यांच्या निधनामुळे त्यांच्या घरातील दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. वृद्ध आईचा हंबरडा आणि वडिलांच्या डोळ्यांतील न थांबणारे अश्रू पाहून उपस्थितांचेही काळीज पिळवटून निघाले. शहीद बाळकृष्ण यांच्या मागे आई, वडील, पत्नी पूनम, भाऊ शिवराज आणि बहीण रूपाली असा परिवार आहे. विशेषतः त्यांची अर्णव आणि प्रणव ही दोन लहान मुले आपल्या वडिलांच्या परतण्याची वाट पाहत होती, हे दृश्य पाहून पिंपळोशी गावातील प्रत्येक डोळा पाणावला होता.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
शहीद बाळकृष्ण निकम यांचे पार्थिव लष्करी विमानाने पुण्यात आणि तेथून रुग्णवाहिकेने त्यांच्या मूळ गावी पिंपळोशी येथे आणले जाणार आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीने अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शहीद निकम यांना शासकीय इतमामात आणि लष्करी लवाजम्यासह अखेरचा निरोप देण्यात येईल. सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने नागरिक या वीरपुत्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा







