Saturday, September 12, 2026
Homeसातारासाताऱ्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल; शंभूराज देसाईंच्या घरी राजकीय हालचालींना वेग

साताऱ्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल; शंभूराज देसाईंच्या घरी राजकीय हालचालींना वेग

सातारा प्रतिनिधी :- राज्यभरात आज 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून त्याचा निकाल उद्या 16 जानेवारीला जाहीर होणार आहे. त्यानंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून रणनीती आखली जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात समन्वयाची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर आज साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याचे समजते.
या बैठकीला माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच अजित पवार गटाचे खासदार नितीन काका पाटील उपस्थित होते. बैठकीबाबत विचारणा केली असता रामराजे नाईक निंबाळकर यांनी, “पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नवीन घरी चहा घेण्यासाठी आलो होतो,” असे सांगत कोणतीही राजकीय भूमिका नाकारली. “चहा चांगला होता,” असे मिश्कील उत्तर देत त्यांनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
या निवडणुका रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यात होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 16 ते 21 जानेवारी दरम्यान असणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments