Wednesday, August 26, 2026
Homeसातारागाळेधारकांचा आवाज बुलंद – भाडेवाढीविरोधात फलटणमध्ये बेमुदत साखळी उपोषण सुरू!

गाळेधारकांचा आवाज बुलंद – भाडेवाढीविरोधात फलटणमध्ये बेमुदत साखळी उपोषण सुरू!

फलटण | प्रतिनिधी :- फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळेधारकांवर लादलेली अन्यायकारक भाडेवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी करत आजपासून गाळेधारकांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. गाळे बंद ठेवत आणि शहरातून पायी चालत गाळेधारकांनी प्रशासनाचा निषेध केला.

या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील उपस्थित होते. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ठामपणे सांगितले की, “या भाडेवाढीविरोधातील लढ्यात आम्ही गाळेधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. एकाही गाळेधारकाच्या गाळ्याला धक्का लागू देणार नाही.”

गाळेधारकांचा संयम संपत चालला आहे – संघर्ष समिती आक्रमक

फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी तीव्र शब्दात बाजार समितीच्या कारभारावर टीका केली. “गाळेधारकांचे हित कधीच पाहिले गेले नाही, संचालक मंडळ त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप त्यांनी केला. त्यांनी इशारा दिला की, “जर भाडेवाढ रद्द झाली नाही, तर दिवाळीतसुद्धा आंदोलन अधिक आक्रमक पद्धतीने चालू राहील.”

“उपोषणकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही”

श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळा परिसरात उपोषण सुरू असून, तेथे न्याय मिळाल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बाजार समितीच्या चेअरमनला गाळेधारकांना न्याय देण्याचे आवाहन करत म्हटले की, “दिवाळी आनंदाने साजरी व्हावी, यासाठी तोडगा लवकर काढा, अन्यथा शिमग्याला निमंत्रण मिळेल.”

उपस्थित मान्यवर – एकतेचा निर्धार

या उपोषणस्थळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सिराजभाई शेख, आमिरभाई शेख, शंकरराव उर्फ बंडू कदम यांच्यासह अनेक गाळेधारक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने भाडेवाढीविरोधात आवाज उठवत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
गाळेधारकांचा हा लढा केवळ भाडेवाढीविरोधात नाही, तर त्यांच्या हक्कांसाठीचा आहे. बाजार समितीने याचा गांभीर्याने विचार करून तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे, अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments