Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रकेतन अग्रवाल हत्या प्रकरण : सिया गोयल आणि चेतन चौधरी आज न्यायालयात;...

केतन अग्रवाल हत्या प्रकरण : सिया गोयल आणि चेतन चौधरी आज न्यायालयात; पोलिसांच्या तपासातील महत्त्वाचे धागेदोरे होणार सादर

पुणे | प्रतिनिधी :-केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असून, दोघांना दुपारी अडीच वाजल्यानंतर वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायाधीश ए. एम. विभूते यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार असून, तपासादरम्यान पोलिसांनी मिळवलेल्या महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे पुढील कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
सिया गोयल हिच्या वतीने यापुढे ॲड. विपुल दूशिंग बाजू मांडणार असल्याचे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यापूर्वी तिचे प्रतिनिधित्व करणारे ॲड. आशुतोष श्रीवास्तव यांनी या प्रकरणातून माघार घेतल्याची चर्चा आहे. चेतन चौधरीच्या बाजूने ॲड. राधिकेश उत्तरवार आणि ॲड. राम शहाणे युक्तिवाद करणार असून, सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील राजश्री विरकुड मांडणार आहेत.
पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत काय तपास झाला?
पोलीस कोठडीत असताना तपास पथकाने विविध ठिकाणी आरोपींना घेऊन जाऊन घटनाक्रमाची पुनर्रचना केली तसेच डिजिटल आणि भौतिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला.
तपासादरम्यान पुढील मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले –
पुण्यातील लुल्लानगर येथील कॅफेमध्ये बसून कट रचल्याचा संशय असलेल्या ठिकाणाची पाहणी.
लुल्लानगरमधील टेकडीवर हत्येचा सराव केल्याच्या दाव्याची पडताळणी.
आरोपी आणि इतर संबंधितांच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा फॉरेन्सिक प्रयोगशाळेतून पुनर्प्राप्त करून डिजिटल पुराव्यांची तपासणी.
गुन्ह्यानंतर आरोपींनी कोणाशी संपर्क साधला किंवा कटाबाबत चर्चा केली का, याची चौकशी.
लोहगड किल्ल्यावर घटनाक्रमाची पुनर्रचना करून सीसीटीव्हीतील हालचालींची पडताळणी.
३१ मे, ४ जून आणि १४ जून रोजीही हत्येचा प्रयत्न झाला होता का, याचा तपास.
खालापूर टोलनाक्याजवळील फूड मॉल परिसरात केतन अग्रवाल यांचा पासपोर्ट शोधण्याचा प्रयत्न.
नव्याने समोर आलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदवून आरोपींसमोर चौकशी.
हत्येपूर्वी लोहगड किल्ल्याची किती वेळा रेकी करण्यात आली, याचा शोध.
या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याबाबत आरोपींकडे कसून चौकशी.
हत्येच्या दिवशी सियाने वापरलेले कपडे तिच्या मार्केटयार्ड येथील घरातून जप्त करण्यात आले, तर चेतनची पँटही जप्त करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.
या सर्व तपासातून मिळालेले पुरावे आणि धागेदोरे आज न्यायालयात सादर केले जाणार असून, त्यावरून पुढील तपासाची दिशा आणि आरोपींच्या कोठडीबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments