Sunday, September 13, 2026
Homeसातारामतदार यादीतील गोंधळाचा उमेदवारांना फटका; निवडणुकीवर बहिष्काराची शक्यता?

मतदार यादीतील गोंधळाचा उमेदवारांना फटका; निवडणुकीवर बहिष्काराची शक्यता?

फलटण, ता. १२ ऑक्टोबर –स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच फलटण नगरपरिषद क्षेत्रात मतदार यादीतील मोठ्या गोंधळामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदार यादीतील चुकीच्या नोंदींमुळे इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढली असून, या गोंधळामुळे शहरात नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

इच्छुक उमेदवारांनी जेव्हा मतदार यादीच्या प्रती अभ्यासासाठी घेतल्या, तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. अनेक मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागाऐवजी इतर प्रभागांमध्ये स्थानांतरित झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही प्रकरणांमध्ये असेही आढळले की, ज्यांचा त्या भागाशी कोणताही संबंध नाही, अशा बाहेरगावच्या लोकांची नावेही यादीत आढळली.

या संदर्भात काही उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “चुकीच्या प्रभागात गेलेल्या नावांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल. आधारकार्ड पाहूनच अंतिम निर्णय घेतला जाईल.” मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ असून, एका मतदाराची पडताळणीसाठी किमान १० ते १५ मिनिटे लागतात. हजारो नावांच्या दुरुस्तीचा विचार करता, संपूर्ण यादी सुधारण्यासाठी सहा महिने लागण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेवरच संशय घेतला जात असून, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जर समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments