सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे खळबळ;

0
7


Vidhan Parishad Election 2026: सध्या सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच सोशल मीडियावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे आता या निवडणुकीला एक नवा आणि अनपेक्षित ट्विस्ट मिळाला असून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांना विधानपरिषदेवर काम करण्याची संधी देणार असल्याचा जाहीर शब्द दिला होता. या आश्वासनानंतर शेखर गोरे यांनी स्थानिक पातळीवर भाजपचे काम करत माण-खटाव मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांच्या विजयात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता सातारा-सांगली विधानपरिषदेची निवडणूक तोंडावर आली असताना हाच व्हिडिओ समोर आल्याने फडणवीस आपल्या शब्दाची पूर्तता करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis: नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? 

या व्हायरल व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, सातारा जिल्ह्यातील एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखले जाते ते शेखर गोरे हे भारतीय जनता पक्षात आमच्या सोबत येत आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. शेखर गोरेंनी आपले स्वतःचे नेतृत्व तयार केले आहे. समाजामध्ये आपली ओळख तयार केलेली आहे. त्यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला एक विशेष फायदा होईल. मी शेखर गोरे यांना आश्वस्त केलेले आहे की, भविष्यात त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल. त्यांना विधानमंडळात काम करता येईल, अशा प्रकारची कार्यवाही देखील महायुती आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू, असे त्यांनी म्हटले होते. आता विधान परिषद निवडणुकीच्या वेळी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

Vidhan Parishad Election 2026: सातारा-सांगली विधान परिषदेसाठी उमेदवारांचा सस्पेन्स कायम

दरम्यान, सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत जवळपास निश्चित मानली जात असली, तरी दोन्ही बाजूंचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. महायुतीतून भाजप तर महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. साताऱ्यातून धैर्यशील कदम, शेखर गोरे आणि सुनील काटकर यांची नावे चर्चेत आहेत, तर सांगलीतून पृथ्वीराज देशमुख आणि सम्राट महाडिक यांची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांच्या नावांची चर्चा असून, तिसऱ्या पर्यायाचाही शोध सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, मतदारसंघातील बलाबल पाहता महायुतीचे पारडे जड मानले जात आहे.

Vidhan Parishad Election 2026: सातारासांगली जिल्ह्यात पक्षीय बलाबल

भाजप- 314, राष्ट्रवादी काँग्रेस- 205, शिवसेना शिंदे गट- 111 = एकूण 630

राष्ट्रवादी शरद पवार- 119, काँग्रेस- 73 आणि उबाठा – 1 = एकूण 193

आणखी वाचा 

Manoj Jarange Patil Protest: आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही; आमरण उपोषण करण्याआधी मनोज जरांगेंचा एकच इशारा, काय काय म्हणाले?

आणखी वाचा



Source link