- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Lover Lok Prashasan Article Written By Shekhar Gaikwad Over Office Holiday
शेखर गायकवाड3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘पूर्वीचा काळ आता राहिला नाही,’ असा उमाळा काढणारे बरेच लोक नोकरशाहीतही आहेत. ‘आम्ही एकदा दौऱ्यावर गेलो की पाच दिवस बाहेरच काढायचो. झणझणीत जेवणं झोडत शुक्रवारी दुपारी तसंच गावी जायचो. पण, आता मोबाइलवर, व्हॉट्स ॲपवर काय काय कामं सांगतात.. फोनवरुनच ऑफिसला कधीही बोलावतात.. पण, आमच्याएवढी मजा नोकरीत कुणी केली नाही!’ असं अनेक जण अभिमानानं सांगत असतात.
आपल्या प्रशासनात आणि एकूणच शासकीय व्यवस्थेत रजेचे असंख्य प्रकार असतात. किरकोळ रजा, अर्धवेतनी रजा, वैद्यकीय रजा, परिवर्तित रजा, अनर्जित रजा, असाधारण रजा, निवृत्तीपूर्व रजा, प्रसूती रजा, अध्ययन रजा इ. इ. अनेक प्रकारांमुळे काही वेळा कर्मचारी अधूनमधून कार्यालयात काम करण्यासाठी येतात, असा भास निर्माण होतो. वास्तविक रजा म्हणजे रजेसाठीच्या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्याने घेतलेली गैरहजेरीची परवानगी. पण, प्रशासनातील अनेक कर्मचाऱ्यांनी या रजेच्याही नाना तऱ्हा निर्माण केल्या आहेत. किरकोळ रजा ही किरकोळ नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक असताना ऐनवेळी त्यांची पंचाईत करणारी रजा असते. पुढच्या तीन दिवसांत अमुक एक महत्त्वाचे काम करा, असा हुकूम एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सोडला की या कॅटेगरीतील कर्मचारी त्याच्या नेमक्या दुसऱ्या दिवशी, ‘मी एक दिवसाच्या किरकोळ रजेवर आहे,’ असे सांगून मोकळा होतो! शासकीय सुटीला जोडून किरकोळ रजा घेतल्यास त्यातून ‘अर्धा आठवडा रजा’ नावाची एक नवी अन् अद्भूत वर्गवारी तयार होते.
‘खुशीची रजा’ हा एक नियमात नसलेला आणखी एक रजेचा प्रकार निर्माण झाला आहे. या प्रकारात सध्याच्या चांगल्या पदावरून कुठल्या तरी साइड पोस्टला आपली बदली झाल्याचे आदेश येताच एखाद्या अधिकाऱ्याची तब्येत अचानक बिघडते. त्यांना कामावर असताना अचानक दरदरुन घाम येतो, छातीत दुखू लागते अन् हॉस्पिटलमध्ये ॲडमिट न होताच महिनाभर विश्रांती घेण्याची लेखी परवानगी डॉक्टर देतात. मधला काळ हॉस्पिटलऐवजी मंत्रालयात हेलपाटे मारण्यासाठी घालवला जातो. अन्य चांगल्या पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी नेत्यांना भेटून, त्यांची पत्रे घेऊन, धावपळ करून शेवटी पत्रावर मंत्र्यांचा शेरा घेतला की पहिला टप्पा संपतो. नंतर या पत्रासह अनुकूल बदलीची फाईल पुन्हा सहायक आणि कक्ष अधिकाऱ्यामार्फत मंत्र्यांकडे जाईपर्यंत पुढचे टप्पे सुरू राहतात!
पोलिस विभागात प्रतिकूल बदलीच्या प्रसंगी ‘मी सिकमध्ये आहे’ हे परवलीचे वाक्य वापरले जाते. विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या स्वाक्षरीने सरकारला प्रमाणपत्र सादर केल्यावर आणि त्यामध्ये पुढील १५ दिवस संबंधित अधिकाऱ्यासाठी बेड रेस्ट अत्यावश्यक असल्याचे नमूद केल्यावरही हॉस्पिटलचे बेड सोडून पूर्णवेळ मंत्रालयात फिरणाऱ्या या अधिकाऱ्याला त्याबद्दल कोणीच काही विचारत नाही. या काळात ‘बेड रेस्ट’ सांगितलेला अधिकारी लिफ्टची वाट न पाहता मंत्रालयाचे मजले किती भराभर चढतो, हे पाहण्यासारखे असते! असा हा तंदुरुस्त असलेला अधिकारी चक्क स्थानिक नेत्यांमार्फत मंत्र्यांना भेटून, आपण आजारी असल्याचे नमूद करुन इच्छित ठिकाणी बदली करण्याची मागणी करतो.
सर्वात कळस म्हणजे, व्यावसायिक डॉक्टरांनी दिलेला महिनाभर विश्रांती घेण्याचा लेखी सल्ला हातात असतानाही इच्छित ठिकाणी बदली मिळाल्यावर मात्र अचानक संबंधित अधिकाऱ्याच्या तब्येतीत सुधारणा झाली असल्याचे प्रमाणपत्र मिळते. तसे झाले नाही तर मात्र ही ‘खुशीची रजा’ पुढे अनेक महिने चालूच राहते. अशा सोयीने बदलणाऱ्या सुटीच्या योगाला ‘खुशीची रजा योग’ म्हणतात!
एकदा अशीच वारंवार खुशीची रजा घेणाऱ्या एका अधिकाऱ्याची खोड कायमस्वरुपी जिरवायचे एका वरिष्ठ आणि चाणाक्ष अधिकाऱ्याने ठरवले. नात्यातील एका वरिष्ठ मंत्र्यांच्या मदतीच्या बळावर तो तब्बल २० वर्षे ठराविक ठिकाणीच कार्यरत होता. ‘या अधिकाऱ्याची बदली का होत नाही?’ अशी विचारणा दरवर्षी सगळ्या संघटना करीत. त्या नव्या अधिकाऱ्याने गेल्या २० वर्षांत प्रत्येक बदलीच्या वेळी या अधिकाऱ्याने दिलेले सर्व रजेचे अर्ज, डॉक्टरांची प्रमाणपत्रे इ. सगळ्या फाईल काढल्या. त्या आधारे त्याने एक सविस्तर अहवाल तयार करुन तो स्टँडिंग मेडिकल बोर्डाला पाठवला. ‘एवढ्या चांगल्या अधिकाऱ्याला गेल्या २० वर्षांहून जास्त काळापासून हृदयरोग असल्यामुळे त्यांची सविस्तर तपासणी करावी,’ असे त्यात नमूद केले. आणि मग स्टँडिंग मेडिकल बोर्डाचा अहवाल आल्यावर त्या अधिकाऱ्याला विश्रांतीसाठी त्याच्या गावाजवळ पाठवण्याचे आदेशही काढले! असे काही हुशार अधिकारी प्रशासनात आल्यामुळे खुशीच्या रजेचा शेवट खुशीमध्येच होईल, याची कोणतीही शाश्वती आता राहिलेली नाही.
खरे तर ‘पूर्वीचा काळ आता राहिला नाही,’ असा उमाळा काढणारे अनेक लोक नोकरशाहीतही आहेत. ‘आम्ही एकदा दौऱ्यावर गेलो की पाच दिवस बाहेरच काढायचो. झणझणीत जेवणं झोडत झोडत शुक्रवारी दुपारी तसंच गावी जायचो. पण, आता मोबाइलवर, व्हॉट्स ॲपवर काय काय कामं सांगतात.. फोनवरुनच ऑफिसला कधीही बोलावतात, कधीही अचानक मोर्चे काय निघतात, अधिकाऱ्यांना धारेवर काय धरतात.. पण, आमच्याएवढी मजा मात्र नोकरीत कुणीच केली नाही!’ असं अनेक सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी अगदी अभिमानानं सांगतात. दरवर्षी एप्रिल महिन्यात जोडून सुट्या आल्या की, अतिशय आनंदी होणारे कर्मचारी आजही नोकरशाहीत आहेत. जपानमध्ये कर्मचारी सुटी घेत नाहीत, हे वाचल्यावर एका सुटी योगावरच्या अधिकाऱ्याला फार दु:ख झाले. ‘जपानी नागरिकांच्या जीवनात समाधान नाही, हे मी डोळे झाकून सुटीच्या दिवशी सिद्ध करायला तयार आहे..’ अशी त्याने घोषणाच केली आहे!
(संपर्क- shekharsatbara@gmail.com)




