बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. या निकालामुळे कारखान्याच्या सत्तेवर सुनेत्रा पवार गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले असून, सहकार क्षेत्रातील या निवडणुकीची बारामतीच्या राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे.
दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रथमच या निवडणुकीची धुरा सांभाळली होती. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक केवळ संचालक मंडळ निवडण्यापुरती मर्यादित न राहता, नेतृत्वाची ताकद आणि सभासदांचा कौल तपासणारी लढत ठरली. निकालातून सुनेत्रा पवार यांच्या पॅनलला सभासदांनी एकमुखी पाठिंबा दिल्याचे चित्र समोर आले.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवार यांच्या पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. संग्राम सोरटे, प्रमोद काकडे, अभिजीत काकडे आणि वसंतराव दगडे यांच्या विजयाने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर उर्वरित जागांचे निकाल जाहीर होताच २१ पैकी २१ जागांवर या पॅनलने विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले. बारामती परिसरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून विजयाचा जल्लोष साजरा केला.
पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलला मोठा धक्का
कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आले नाही. जगताप यांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विरोधी पॅनलला एकही जागा जिंकता न आल्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या राजकारणात सत्ताधारी गटाचे वर्चस्व अधिक ठळक झाले आहे.
विजयानंतर अभिजीत काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या यशाचे श्रेय सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना दिले. प्रचारादरम्यान सुनेत्रा पवार यांनी घेतलेला सक्रिय सहभाग आणि कार्यकर्त्यांनी केलेले संघटनात्मक प्रयत्न विजयासाठी महत्त्वाचे ठरल्याची भावना समर्थकांनी व्यक्त केली.
आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान
निवडणुकीत मिळालेल्या निर्विवाद यशानंतर नव्या संचालक मंडळासमोर कारखान्याचा कारभार अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्याचे आव्हान असेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर, वेळेवर ऊसबिले, कारखान्याची आर्थिक स्थिती, उत्पादनक्षमता आणि सभासदांचे हित या प्रश्नांकडे नव्या नेतृत्वाला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
२१ पैकी २१ जागांवरील विजयामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला सहकार क्षेत्रात मोठे बळ मिळाले आहे. मात्र, या विजयाचे रूपांतर शेतकरी आणि सभासदांच्या प्रत्यक्ष फायद्यात कितपत होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीतील यशानंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा आगामी कारभार कोणत्या दिशेने जातो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
