डीवायएसपी चैतन्य कदम यांची भेट घेऊन निवेदन; संवेदनशील भागांत नियमित पेट्रोलिंग आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली आहे.
गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी युगेंद्र पवार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांची भेट घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला निवेदन देत आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली.
बारामती शहरातील विविध भागांत अलीकडच्या काळात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः गर्दीची ठिकाणे, संवेदनशील परिसर आणि गुन्हेगारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या भागांमध्ये पोलिसांची नियमित गस्त वाढविणे आवश्यक असल्याचे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.
शहरात कायद्याचा धाक कायम राहिला पाहिजे. नागरिकांना कोणत्याही भीतीशिवाय सुरक्षित वातावरणात वावरता आले पाहिजे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे, संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
बारामती शहराची शांत आणि सुरक्षित शहर म्हणून असलेली ओळख कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी. नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये, अशी भूमिका युगेंद्र पवार यांनी मांडली.
यावेळी राजेंद्र जगताप, आरती शेंडगे, वनिता बनकर, सुभाष ढोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष!
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कोणत्या ठोस उपाययोजना केल्या जाणार, संवेदनशील भागांत गस्त वाढविली जाणार का आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार, याकडे आता बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.
