Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रपुस्तकामागच्या गोष्टी: मराठी अंताजीचा ब्रिटिश प्रेरणास्रोत

पुस्तकामागच्या गोष्टी: मराठी अंताजीचा ब्रिटिश प्रेरणास्रोत

पुस्तकामागच्या गोष्टी: मराठी अंताजीचा ब्रिटिश प्रेरणास्रोत

[ad_1]

आदूबाळ2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

जॉर्ज मॅकडोनाल्ड फ्रेजर

साधारण दहाएक वर्षांपूर्वी ‘अंताजीची बखर’ आणि त्याचा पुढचा भाग ‘बखर अंतकाळाची’ ही नंदा खरेंनी लिहिलेली पुस्तकं वाचून मी थरारून गेलो होतो. असलं काही माझ्या वाचनात पूर्वी कधीच आलं नव्हतं. अंताजी हा पेशवाईतला एक बिनमहत्त्वाचा प्यादा आपल्या कथनातून तत्कालीन सामाजिक – राजकीय स्थितीवर भाष्य करतो, असा त्याचा ढाचा आहे. खुद्द अंताजी शूरवीर काही नसून भित्रा, स्वतःला जपणारा संधिसाधू आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत नंदा खरे मोकळेपणाने अंताजीची प्रेरणा नोंदवतात आणि ती आहे ‘फ्लॅशमॅन’.

फ्लॅशमॅन हा व्हिक्टोरियन काळातील (काल्पनिक) सेनानी. अधिक तपास करता जॉर्ज मॅकडोनाल्ड फ्रेजर या लेखकाच्या सुपीक डोक्यातून आलेलं हे पात्र आहे आणि फ्लॅशमॅनच्या तब्बल १२ कादंबऱ्या आहेत असं कळलं! फ्रेजरबद्दल लिहिण्याआधी फ्लॅशमॅनबद्दल लिहायला पाहिजे. लेखन आणि वाचन या गोष्टी अदृश्य धाग्यांनी जोडलेल्या असतात. मुळात फ्रेजरला फ्लॅशमॅनची कल्पना ‘टॉम ब्राऊन्स स्कूल डेज” या ‘संस्कारक्षम’ पुस्तकावरून सुचली. त्यात संस्कारी टॉम ब्राऊनला घाम फोडणारा एक ‘हॅरी फ्लॅशमॅन’ असतो. दारू पिऊन गोंधळ घातल्याने एक दिवस त्याला बाहेर टाकतात आणि टॉम ब्राऊन पुस्तकांतून तो नाहीसा होतो. फ्रेजरचं लक्ष या पात्राने वेधलं आणि त्याने ‘हॅरी फ्लॅशमॅनचं शाळेतून हाकलला गेल्यानंतरचं आयुष्य’ ही कल्पना घेऊन तिचा विस्तार केला. यातून जन्मला फ्लॅशमॅन हा ‘थोर व्हिक्टोरियन शूरवीर’.

प्रत्यक्षात मात्र तो नीच, खोटारडा, चोरटा, फसवाफसवी करणारा, केसाने गळा कापणारा आणि शेळपट असतो. पण, नशीब, चातुर्य आणि स्वार्थीपणा या गुणांमुळे (?) तो कीर्तीपदी पोचतो. या कादंबऱ्या ‘फ्लॅशमॅनच्या आठवणी’ या स्वरूपात लिहिल्या आहेत, ज्यात तो कोणतीही लपवालपवी न करता जे घडलं तसं लिहितो. एकोणिसाव्या शतकातल्या – सूर्य न मावळणाऱ्या – ब्रिटिश साम्राज्यात घडणाऱ्या घटनांमध्ये फ्लॅशमॅन सापडतो. इतिहासामुळे पुलकित न होता तो बऱ्याच ‘सिनिकल’ भावाने त्या घटनांचं वार्तांकन करतो. इतिहास या गोष्टीकडे छातीफुगवू भावनेने बघणं टाळायचं असेल, तर फ्लॅशमॅनचा डोस सजग वाचकाने जरूर प्यावा. (मराठी इतिहासाबद्दल वाचताना अंताजीही चुकवू नये!)

या थोर कादंबरी मालिकेचा लेखक जॉर्ज मॅकडोनाल्ड फ्रेजर मूळचा स्कॉटिश. त्याच्या आयुष्याचा आणि लेखनाचा प्रवास समांतर झालेला आढळतो. फ्रेजर आपल्या आठवणींमध्ये, ‘मी आळशी विद्यार्थी होतो,’ असं नोंदवतो. त्यामुळे चांगल्या शाळेत आणि विद्यापीठात प्रवेश मिळूनही त्याच्या विद्वत्तेचा काहीच उजेड न पडल्याने तो सामान्य शिपाई म्हणून लष्करात भरती झाला. त्यावेळी दुसरं महायुद्ध शेवटच्या टप्प्यात होतं. फ्रेजरला ब्रह्मदेश आघाडीवर पाठवण्यात आलं. तिथल्या अनुभवांवर लिहिलेल्या ‘क्वार्टर्ड सेफ आऊट हियर’ या आठवणी विधेतला एक उत्कृष्ट नमुना मानता येतील. सामान्य सैनिकाच्या परिप्रेक्ष्यातून युद्ध ‘अनुभवणे’ हा थरारक अनुभव असतो. पुढे युद्ध समाप्ती जवळ आल्यावर त्याची बदली मध्यपूर्वेतील ब्रिटिश लष्करी तळावर झाली. तिथे आलेले अनुभव त्याने आठवणींच्या स्वरूपात न लिहिता कथांच्या स्वरूपात लिहिले. ‘मॅकऑस्लान’ हा सैनिक या कथांचा नायक आहे. याची ख्याती ‘जगातला सर्वात अस्वच्छ सैनिक’ अशी आहे! या कथांचा समग्र संग्रह ‘द कम्प्लिट मॅकऑस्लान’ वाचताना वाचकाची हसून हसून पुरेवाट होते.

युद्ध संपताच फ्रेजरने लष्करातून निवृत्ती घेतली आणि तो पत्रकारितेत दाखल झाला. अटलांटिकच्या दोन्ही बाजूंस पत्रकारिता करता करताच एक दिवस त्याच्या वाचनात ‘टॉम ब्राऊन्स स्कूल डेज’ आली आणि फ्लॅशमॅननेही जन्म घेतला. पहिली फ्लॅशमॅन कादंबरी १९६६ मध्ये प्रसिद्ध झाली. तोपर्यंत ब्रिटनचा वासाहतिक / साम्राज्यवादी ज्वर उतरला होता आणि स्वतःच्या इतिहासाकडे टीकात्म भावाने बघायची दृष्टी रुजली होती. इतिहास हा केवळ पवित्र, अस्पर्श अशी गोष्ट म्हणून उरला नव्हता, त्याकडे त्यातल्या चुकांसहित बघताना नजर खोडकर असली, तरी त्याने अस्मिता दुखावत नव्हत्या. ‘फ्लॅशमॅन’ला भरपूर लोकप्रियता मिळाली. नव्यानेच उदयाला आलेल्या टेलिव्हिजनवर फ्लॅशमॅनला स्थान मिळालं. फ्रेजरला भरपूर यश, लोकप्रियता आणि संपत्तीचा लाभ झाला. संपत्ती इतकी की, कर कमी भरावा लागावा म्हणून त्याने काही काळ ‘आईल ऑफ मॅन’ बेटावर वास्तव्य केलं. पण, लवकरच हॉलिवूडमध्ये पटकथालेखक म्हणून त्याचा शिरकाव झाला. ऐतिहासिक विषयांवरची पकड लक्षात घेता ‘थ्री मस्केटियर्स’ या द्यूमाँच्या कादंबरीची पटकथा लिहायची जबाबदारी त्याला मिळाली. पण, त्याचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे जेम्स बाँड मालिकेतील ‘ऑक्टोपसी’. पुढे त्याला ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ हा सन्मानही देण्यात आला.

(संपर्क-aadubaal@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments