Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रदेश - परदेश: डॉ. कलामांसोबत (काल्पनिक) संवाद

देश – परदेश: डॉ. कलामांसोबत (काल्पनिक) संवाद

[ad_1]

ज्ञानेश्वर मुळे5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘एक असा संपन्न भारत जिथे गरिबी नाही. जो व्यापार- व्यवसायात आणि विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगत राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावून अग्रेसर झालेला, काळानुसार बदलणारी, नाविन्याच्या शोधातील उद्योग-संस्कृती आणि प्रगत, उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा व शिक्षणव्यवस्था असलेला भारत मला अभिप्रेत आहे.’ डॉ. कलाम सांगत होते… — भाग : १ स्थळ : ओडिशातील बालेश्वरमधील फकीर मोहन विद्यापीठ. वेळ : ३० सप्टेंबर २०२४ च्या सूर्योदयाची.

मी बालेश्वरमध्ये अ. भा. अनुवाद परिषदेच्या तिसऱ्या वार्षिक संमेलनासाठी आलो आहे. सकाळी फिरायला म्हणून विद्यापीठाच्या परिसरात निघालो. अतिशय देखणा परिसर, आणि मुख्य म्हणजे झाडी-फुलांनी बहरलेला.. या साऱ्या प्रसन्न वातावरणाचा आनंद घेत चालत असताना एका ठिकाणी एकदम थांबलो. नजर विभाजकावरील बाकावर बसलेल्या व्यक्तीकडे गेली. ओळखीची वाटणारी ती व्यक्ती बाकावर छानपैकी एक हात लांबवून शांत मुद्रेने बसली होती. चेहऱ्यावर बुद्धांप्रमाणे मंद स्मित. बंदगळ्याची सगळी बटणे अगदी जिथल्या तिथे. अरे बापरे! हे तर माजी राष्ट्रपती डॉ. कलाम.. मी थबकलो. मग हळूहळू पुढे झालो.

मी : सुप्रभात सर! आपण इथे इतक्या सकाळी?

डॉ. कलाम : नमस्ते, नमस्ते.. मालदीवच्या माझ्या भेटीनंतर प्रथमच भेटतोय आपण…

मी : म्हणजे ओळखलंत मला. कमाल आहे, १०-१२ वर्षे झाली त्याला..

डॉ. कलाम : ११-१२ नाही. पूर्ण १२ वर्षे झाली. खूप छान झाली होती ती भेट. अत्यंत आनंददायी.

मी : धन्यवाद, सर! खूप छान वाटतेय.. दिल्लीपासून या एकदम दूरस्थ ठिकाणी तुमची अचानक भेट होतेय. मी तर एका परिषदेसाठी आलोय. पण, तुम्ही कसे इथे..?

डॉ. कलाम : तुम्ही राजदूत होता ना? तुम्हाला कल्पना असायला हवी होती. बालेश्वर हा तर माझा अड्डा आहे. तुम्ही मला ‘मिसाइल मॅन’ म्हणता, पण बालेश्वर म्हणजे ‘मिसाइल सिटी’ आहे. ‘चंडीपूर ऑन सी’ ऐकलंय ना? इथून फक्त १८ किलोमीटर. आज आपण नवीन मिसाइलची उड्डाण परीक्षा घेतोय. थोडा वेळ होता. म्हटलं थोडा वेळ इथे बसून मोकळी हवा आणि निसर्गाचा आनंद घ्यावा..

मी : अरे वा! तुमचं हार्दिक अभिनंदन! तुमच्या या योगदानाबद्दल देश सदैव तुमचा ऋणी राहील. एक विचारु का? मी बसू का तुमच्या शेजारी? मला ५-१० मिनिटं बोलता येईल. काही शंका विचारता येतील..

डॉ. कलाम : त्यात विचारायचं काय? अजून वेळ आहे…

डॉ. कलामांनी हातवारे करुन मला बसण्याचे संकेत दिले. मी संकोच करत शेजारी बसलो.

डॉ. कलाम : अहो, ऐसपैस बसा. आपल्या दोघांनाही आता कार्यालयाचे आणि शिष्टाचाराचे ओझे नाही.

मी : धन्यवाद! आपल्याकडे पद संपले तरी लोकांचा ‘अहम्’ संपत नाही. ‘सुंभ जळाला तरी पीळ जात नाही,’ अशी मराठीत एक म्हण आहे..

डॉ. कलाम : आपल्या भाषांमधल्या म्हणी अतिशय सुंदर आहेत. त्या आशयपूर्ण, समजायला सोप्या असतात, भाषेचे सौंदर्य वाढवतात. तुम्ही अनुवादाच्या परिषदेचे आयोजन करताहात, फार चांगली गोष्ट आहे.

मी : पुन्हा कधी भेटाल माहीत नाही. काही प्रश्न विचारु का? तुम्ही ‘इंडिया २०२०’ हे मजबूत भारताचं स्वप्न पाहिलं. ती तुमची संकल्पना प्रत्यक्षात आली, असं वाटतं तुम्हाला?

डॉ. कलाम : मिस्टर मुळे, ती एक संकल्पना होती. तो एक संकल्प आहे. एक असा संपन्न भारत जिथे गरिबी नाही. जो व्यापार- व्यवसायात आणि विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगत राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावून अग्रेसर झालेला, काळानुसार बदलणारी, नाविन्याच्या शोधातील उद्योग-संस्कृती आणि प्रगत, उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा व शिक्षणव्यवस्था असलेला भारत मला अभिप्रेत आहे.

मी : तेच.. ते स्वप्न पूर्ण झाले आहे का?

डॉ. कलाम : अंशत: असे म्हणेन मी. ‘माइल्स टू गो बिफोर वुई स्लीप..’ म्हणतात ना? गरिबी आपोआप जात नसते. विषमता वाढू नये, म्हणून खास प्रयत्न करावे लागतील. आपल्या संपन्न संस्कृतीतील ‘उदात्त, उन्नत, महन्मंगल’ जगापुढे मांडत असताना, आजच्या जगाला साजेशी प्रागतिकता, आधुनिकता आणि समावेशकतेवर आधारित नवी मूल्यव्यवस्था भारताकडून अपेक्षित आहे.

मी : विज्ञान आणि तंत्रज्ञान हे तुमचे आवडते विषय. तुमचे योगदानही मोठे आहे. आम्ही योग्य मार्गावर आहोत का?

डॉ. कलाम : भारत मूलभूत संशोधनात खूप मागे आहे. मूलभूत संशोधन आणि जगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना (अॅप्लिकेशन्स) यावरच यापुढे जगाचे नेतृत्व ठरणार आहे. वैज्ञानिक दृष्टीला पर्याय नाही.

(क्रमश:)

ज्ञानेश्वर मुळे

dmulay58@gmail.com

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments