Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रकबीररंग: साधन के रसधार में, रहै निसदिन भीना रे...

कबीररंग: साधन के रसधार में, रहै निसदिन भीना रे…

[ad_1]

हेमकिरण पत्की7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रपंच-व्यवसायात गुंतलेल्या मनांची पावलं कधीकधी घात-आघातानं अंतर्मुख होतात. आपण कोण आहोत, आपल्या असण्याचा अर्थ काय, या भौतिक जगात सगळंच बदलणारं आहे की काही न बदलणारंही आहे, अशा जगण्याच्या प्रश्नांशी जोडली जातात. मनात एक कुतूहल जागं होतं : भक्तीचा नेमका आशय काय, ती आपली आंतरिक स्थिती आहे की कर्मकांड आहे? नुसता बोलण्याचा विषय आहे की रोजच्या जगण्यातल्या नैमित्तिक क्रिया अवधानासह नीटपणे पार पाडण्याचा विषय आहे? भक्तीचा कुठला विशेष पंथ असतो का? असावा का?… इ.

असे अनेक प्रश्न जगणं गांभीर्यानं घेणाऱ्या मनांना पडतात. अशा विचारी मनांना कबीर आपल्या दोह्यांतून भक्तीचा आशय सांगतात. हा आशय आपण हृदयानं जाणून घेतला तर कर्म आणि ज्ञानाचा मार्ग आपल्याला उमजू शकेल. कबीरांचं सांगणं लख्ख उजेडासारखं आहे. या उजेडात मन जसं आहे तसं दिसू शकतं. भक्तीचा मार्ग कसा असतो, ते सांगताना कबीर म्हणतात…

भक्ति का मारग झीना रे। नहिं अचाह नहिं चाहना,

चरनन लौ लीना रे।।

कबीरांनी त्यांच्या अखंड चिंतनातून स्वतःला सुचलेली भक्तिगीतं, पदं तल्लीन होऊन गायली. त्यांची ही अक्षरठेव कुठल्याही मुद्रित ग्रंथांतून साधकांसाठी उपलब्ध नाही. मात्र, पिढ्यान पिढ्या लोकांनी ही ठेव मुखोद्गत करून जतन केली आहे. या साऱ्या भक्तिगीतांतून कबीरांच्या भक्तिमय जगण्याचा प्रत्यय येतो. कबीरांच्या शब्दांतून, आचरणातून भक्ती अशी ओसंडून वाहताना आपल्याला दिसते.

कबीर भक्तीचे तीन मार्ग सांगतात. एक कर्माचा, दुसरा ज्ञानाचा आणि तिसरा भक्तीचा. त्यांना भक्तीचा मार्ग हृदयातून जाणारा वाटतो. सेवाभाव, ज्ञान-ध्यान याहूनही हा भक्तिमार्ग खूप तरल नि सूक्ष्म असतो, असं ते म्हणतात. कर्ममार्गात गोरगरीब, आजारी, अनाथ, वंचित यांची सेवा करायला भरपूर अवकाश आहे. ज्ञानाचा मार्ग एकल्यानं आचरायचा असतो. पण, भक्तिमार्ग आपलं हृदयपरिवर्तन करणारा व इतरांची हृदयं आपल्याशी जोडणारा असल्यानं कबीर भक्तिमार्गाविषयी खूप तळमळीनं सांगतात…

नहिं अचाह नहिं चाहना, चरनन लौ लीना रे।।

वासना आणि निर्वासना ही वृत्तीची दोन टोकं असतात. कबीर म्हणतात, भक्तीचा मार्ग या दोन्हींच्या मध्यातून जातो. हा मार्ग कबीरांना खूप सूक्ष्म वाटतो. आपलं मन सतत अधिकाची, नव्या नव्या सुखाची मागणी करत असतं. आपण या मनामागून चालत असतो. अधिकाची वासना मनात असली, तर आपण सुखाच्या अधीन होतो. वासना नीट समजून न घेता दुर्लक्षिली तर आपण स्वाभाविक जगण्याला पाठमोरं होण्याची शक्यता असते. यामधल्या स्थितीचा बोध घडण्यासाठी कबीर भक्तिमार्गाची दिशा दाखवतात. अति उपवास किंवा अजीर्ण होईल असं खाण्याहून परिमित आहार उत्तम असतो. कारण तोच देहा-मनाचं आरोग्य राखतो. हीच गोष्ट सर्व इंद्रियांच्या आहारातल्या संतुलनाला लागू असते. हाच तो वासना-निर्वासना यांतला मध्य साधणारा भक्तीचा अतिशय तरल मार्ग आहे. कबीर म्हणतात, या मार्गाची दिशा दिसली की, मग भक्तामध्ये लीनता येते. त्याला देवाच्या चरणांशी लीन होऊन आपला अहंकार विसर्जित करावा वाटतो. यामुळंच भक्ताच्या हृदयात कायम ओलावा राहतो. भक्त सदाच सहृदय होऊन जातो. कसा तर…

साधन के रसधार में, रहै निसदिन भीना रे।

भक्तीच्या साधनांत म्हणजे कीर्तन, नामस्मरण, जप यांत भक्त ओलाचिंब असतो. देवाचं सान्निध्य लाभेल अशा प्रत्येक साधनाशी तो आतून जोडलेला असतो. भक्तीचा मार्ग संतांच्या संगतीत असतो, त्यांची वचने आचरण्यात असतो. हे जाणून भक्त अनुग्रहित असतो, संतुष्ट असतो. काळ्या आईवर प्रेम करणारा शेतकरी जसा पावसाच्या उशिरा येण्याविषयी, अनियमित असण्याविषयी देवाजवळ तक्रार करत नाही, तशीच भक्ताची आंतरिक स्थिती असते.

राग में श्रुत ऐसे बसै, जैसे जल मीना रे।

साईं सेवत में देइ सिर, कुछ विलय न कीना रे।।

भक्ताच्या प्रेमभावात सारं अध्यात्म आणि शास्त्र सामावलेलं असतं. कबीर म्हणतात, कसं तर पाण्यातल्या माशासारखं. हे प्रतीक आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेलं आहे. मासा पाण्यात असतो, पाण्यातून प्राणवायू घेतो. त्याप्रमाणे भक्त देवावरच्या प्रेमात बुडालेला असतो आणि तीच त्याची प्राणशक्ती असते! कबीर म्हणतात, देवाच्या स्मरणात जीवन घालवायचा हृदयाचा निर्धार झाल्यावर भक्ताचं वेगळं असणं कुठलं! देवाच्या चरणी माथा ठेवून सारा अहंकार विसर्जित करायचा, आपलं संपूर्ण कर्तेपण विसर्जित करायचं, हाच तो भक्तीचा सूक्ष्म मार्ग असतो. बुद्धीतून निघणाऱ्या तर्कट, कल्पनाजन्य, संदेहग्रस्त आणि अभावग्रस्त गोष्टी देवचरणाशी ठेवून निश्चिंत व्हायचं. हीच भक्ताची आचारसंहिता असते आणि तीच भक्ताला अंतिम सत्याशी, सर्वमंगलाशी जोडून देते. भक्त आपलं बिंदू असणं ईश्वराच्या सागरात सोडून सागर होऊन जातो. बिंदू स्वतःचं काही न हरवता सागराच्या विशालतेला प्राप्त होतो! आपणही बिंदू होऊन ईश्वराच्या सागरात विलीन होऊ शकतो, ही शक्यता कबीरांच्या या गीतातून आपल्या प्रेमशील मनाला जाणवते.

हेमकिरण पत्की

hemkiranpatki@gmail.com

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments