- Marathi News
- Opinion
- Prehistoric Surgery To Medical Luxury: A Journey To Reduce Pain N Raghuraman Column
4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
अलीकडेच दातातील तीव्र वेदनांमुळे मला डेंटिस्टकडे जाण्याची भीती वाटत होती, कारण त्यांनी दात काढण्याचा सल्ला दिला होता. पण शेवटी मला जावेच लागले, कारण त्यांनी कमीत कमी वेदना होतील असा भरवसा दिला होता. त्यांनी गंमतीने म्हटले की, ‘माझी लॅब कदाचित लॉस एंजेलिसच्या सेडर्स-सिनाई मेडिकल सेंटरसारखी नसेल, पण मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की तुमचा हा अनुभव 59 हजार वर्षांपूर्वी दातदुखीने त्रस्त असलेल्या निअँडरथल मानवाच्या अनुभवाइतका कठीण नसेल.’ त्यांच्या या बोलण्याने मला गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडले की, त्यांनी तुलनेसाठी या दोन अगदी वेगवेगळ्या गोष्टीच का निवडल्या.
सेडर्स-सिनाई हे तेच अत्यंत प्रसिद्ध रुग्णालय आहे, जिथे 2023 मध्ये शूटिंगदरम्यान झालेल्या एका किरकोळ अपघातानंतर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानवर उपचार झाले होते. हे हॉलीवूडचे आघाडीचे तारे आणि जगातील अब्जाधीशांचेही आवडते मेडिकल डेस्टिनेशन आहे. याचे कोणतेही अधिकृत दरपत्रक नाही, परंतु 2019-20 च्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या फीच्या तपशिलानुसार, तिथे हृदय प्रत्यारोपणाची किंमत 33 लाख डॉलर म्हणजेच सुमारे 31 कोटी रुपये होती. अर्थात, मी ज्या दात काढण्याच्या प्रक्रियेतून गेलो, तिथे त्यासाठी 800 डॉलर म्हणजे 77 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार नाही. पण मी विचार केला की, अखेर ही जागा इतकी प्रसिद्ध का आहे? वास्तविक पाहता, तिथे रुग्णांना एक क्युरेटेड लाइफस्टाइल एक्स्पीरियन्स दिला जातो. तिथे पाठीमागच्या बाजूला एक गुप्त प्रवेशद्वारही आहे, जेणेकरून रुग्णालयात दाखल होताना या अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती पापाराझीच्या कॅमेऱ्यांपासून वाचू शकतील.
ऑनलाइन शोध घेतल्यावर समजले की, ही जागा फाइन आर्ट, संगीत, अॅम्बियंट लायटिंग आणि जगाच्या वेगवेगळ्या भागांतून आणलेल्या सुंदर आर्किटेक्चरल वस्तूंनी सजलेली आहे, जेणेकरून रुग्णाला सहज आणि आरामदायी वाटावे व तो बरा होत असल्याचा त्याला अनुभव यावा. तिथे एकही पारंपारिक पायरी नाही, ज्यावरून रुग्णाला चढावे लागेल. सुमारे तीन लाख रुपये किमतीचे प्रीमियम इटालियन बेड आहेत. जर तुम्ही प्रचंड श्रीमंत असाल आणि तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही, तर तिथे 75 पेक्षा जास्त लोकांची इन-हाऊस डिझाइन आणि आर्किटेक्चर टीम आहे, जी तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट बदलू शकते. रिसेप्शन एरियामध्ये एखाद्या हाय-एंड बुटिक हॉटेलच्या लॉबीसारखे पांढरेशुभ्र आणि डोळ्यांना सुखावणारे वातावरण आहे. वर एक प्रतीक्षा कक्ष आहे, जी एखाद्या प्रायव्हेट जेट डिपार्चर लाउंजसारखी दिसते. कन्सल्टिंग रूममधील ब्रँडेड सोफा सेट, 4400 ते 7400 रुपये किमतीचा लक्झरी एईसोप हँडवॉश आणि अशा असंख्य गोष्टी तिथे आहेत. आणि शेवटी, ते दावा करतात त्यानुसार, तिथे जागतिक ख्यातीचे मेडिकल प्रोफेशनल्स आहेत.
तरीही, 59 हजार वर्षांपूर्वी निअँडरथलच्या प्राचीन युगातही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होत असत. अलीकडेच सायबेरियातील एका गुहेत सापडलेल्या प्राचीन दातावर झालेल्या महत्त्वपूर्ण अभ्यासात, विचारपूर्वक केलेल्या दातांच्या शस्त्रक्रियेचे संकेत मिळाले आहेत. बहुधा यामध्ये दातांची सडलेली जागा काढण्यासाठी आणि वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी दगडाचे छोटे अवजार वापरले गेले होते. नामशेष झालेल्या आपल्या जवळच्या नातेवाइकांनी इतकी क्लिष्ट आणि इन्व्हेसिव्ह डेंटल प्रोसिजर केली होती आणि त्यांच्याकडे विचारपूर्वक केलेली वैद्यकीय रणनीती, अचूकपणे हात चालवण्याचे कौशल्य यांसारख्या कॉग्निटिव्ह क्षमता होत्या. यामुळे ही पारंपरिक धारणा मोडीत निघते की, अशा गुंतागुंतीच्या गोष्टी केवळ आपण होमो सेपियन्सच करू शकत होतो. हा अभ्यास या वर्षी 13 मे रोजी ओपन-ॲक्सेस जर्नल ‘पीएलओएस वन’ मध्ये रशियन वैज्ञानिकांच्या टीमद्वारे प्रकाशित करण्यात आला. लक्षात ठेवा की मानवाच्या तोंडात काम करणे अत्यंत कठीण असते. संशोधकांचे असे मत आहे की, त्या काळात सर्जरी करणाऱ्या व्यक्तीकडे उत्कृष्ट कौशल्य, अपार संयम आणि एक विश्वासू सहायक नक्कीच असावा, जो रुग्णाचे डोके स्थिर ठेवू शकेल, कारण तेव्हा लोकल अॅनेस्थेशिया नसायचा.
मोबाईलवर हा स्तंभ ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
फंडा असा आहे की, जर तुम्ही स्वतःला तुमच्या आजाराबद्दल काहीतरी नवीन जाणून घेण्यात व्यग्र केले, तर वेदनेकडे लक्ष कमी जाते. कारण मनाला हे शिकून अभिमान वाटतो की त्याने काहीतरी नवीन जाणून घेतले आहे, जे पूर्वी माहीत नव्हते.








