राजकीय स्वार्थासाठी श्रीराम कारखाना अडचणीत आणू नका; कामगारांचा तळतळाट लागेल – संजीवराजे नाईक निंबाळकर

0
3
राजकीय स्वार्थासाठी श्रीराम कारखाना अडचणीत आणू नका; कामगारांचा तळतळाट लागेल – संजीवराजे नाईक निंबाळकर

राजकीय स्वार्थासाठी श्रीराम कारखाना अडचणीत आणू नका; कामगारांचा तळतळाट लागेल – संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण | प्रतिनिधी :  श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नावर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. राजकीय स्वार्थापोटी कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्यास कामगार, शेतकरी आणि सभासदांचा तळतळाट संबंधितांना लागेल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढून सुस्थितीत आणण्याचे काम आम्हीच केले असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

श्रीराम कारखान्याबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सहयोगी तत्त्वावर कारखाना चालवण्यासाठी देताना तो सहकारी संस्थेलाच द्यावा किंवा खासगी संस्थेला देऊ नये, अशी कोणतीही अट शासन निर्णयात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘दत्त इंडिया’ कंपनीने शासन निर्णयातील सर्व अटी पूर्ण केल्या असून साखर आयुक्तांनीही या प्रक्रियेला मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांची पत्रकार परिषद ही केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी असल्याचा आरोप करताना संजीवराजे म्हणाले की, त्यांच्या राजकारणामुळेच कारखाना बंद राहण्याची वेळ आली आहे. कामगार आणि ऊस उत्पादकांना याची पूर्ण जाणीव असून आता स्वतःची भूमिका झाकण्यासाठी विरोधक पत्रकार परिषदांचा आधार घेत आहेत. कारखान्याबाबत मोठमोठ्या घोषणा करणाऱ्यांनी स्वतः कधी कारखान्याला ऊस घातला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठीच तो यापूर्वी जवाहर कारखान्याला सहयोगी तत्त्वावर चालवण्यासाठी देण्यात आला होता. त्यानंतर ‘दत्त इंडिया’ आणि ‘शरयू’ या कंपन्यांनीही कारखाना चालवण्याची तयारी दर्शवली होती. सभासदांच्या संमतीनंतर कारखाना ‘दत्त इंडिया’कडे चालवण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. योग्य व्यवस्थापन मिळाल्यास कारखाना सक्षमपणे चालेल आणि त्याचा फायदा सभासद, शेतकरी व कामगारांना होईल, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार होतो. मात्र माजी खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून आणि राजकीय प्रभावाचा वापर करून निवडणूक पुढे ढकलली, असा आरोपही त्यांनी केला. काही मंडळींना कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना बंद पाडायचा आहे, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी कारखान्याची कायदेशीर बाजू स्पष्ट केली. सातत्याने गळीत हंगाम तोट्यात जात असल्यामुळे करार पुढे सुरू ठेवणे शक्य नसल्याचे अधिकृत पत्र जवाहर कारखान्याने दिले होते. त्यानंतर कारखाना स्वतः चालवण्यासाठी विविध बँकांकडे कर्जाची मागणी करण्यात आली, मात्र अपेक्षित आर्थिक मदत न मिळाल्याने संचालक मंडळाने कारखाना स्वतः चालवणे शक्य नसल्याचा निर्णय घेतला.

हा विषय उच्च न्यायालयासमोर मांडल्यानंतर न्यायालयाने कारखाना कायदेशीर पद्धतीने भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी देण्यास परवानगी दिली. न्यायालयाच्या निर्णयानुसार विशेष सर्वसाधारण सभा घेऊन ‘दत्त इंडिया’सोबत पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेत सर्व कायदेशीर व शासकीय नियमांचे पालन करण्यात आले असून प्रस्ताव साखर आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. मात्र नंतर राजकीय दबावामुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आल्याचा आरोप डॉ. शेंडे यांनी केला.

या पत्रकार परिषदेला कारखान्याचे पदाधिकारी, संचालक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.