Tuesday, August 11, 2026
Homeफलटणफलटणच्या विकासाला नवी झेप; विमानतळ, रेल्वे, बुलेट ट्रेनसह मोठ्या प्रकल्पांची घोषणा –...

फलटणच्या विकासाला नवी झेप; विमानतळ, रेल्वे, बुलेट ट्रेनसह मोठ्या प्रकल्पांची घोषणा – रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटणच्या विकासाला नवी झेप; विमानतळ, रेल्वे, बुलेट ट्रेनसह मोठ्या प्रकल्पांची घोषणा – रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण | प्रतिनिधी. फलटण तालुक्याच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आगामी काळात मार्गी लागणार असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून फलटणला विमानतळ, रेल्वे सेवा, बुलेट ट्रेन थांबा, नवीन जिल्ह्याचा दर्जा तसेच विविध प्रशासकीय कार्यालये मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

निंबाळकर म्हणाले की, पुरंदरच्या धर्तीवर फलटण येथे नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. येत्या १० ते १५ दिवसांत केंद्रीय व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत विमानतळ प्रकल्पाबाबत पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.

सोलापूर विमानतळाप्रमाणेच फलटण विमानतळावरून मुंबई, पुणे, गोवा, दिल्ली यांसारख्या प्रमुख शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्याचा तात्विक प्रस्ताव मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे ३ हजार फूट धावपट्टी असलेल्या या विमानतळाला राष्ट्रीय दर्जाचे स्वरूप देण्याचे नियोजन असून यासाठी अंदाजे २ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

फलटण तालुक्याची अनेक वर्षांपासूनची विमानतळाची मागणी पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे सांगताना निंबाळकर यांनी २०२९ पर्यंत या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, असा विश्वास व्यक्त केला. या विमानतळामुळे फलटणला राज्य व राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त होईल, असेही त्यांनी नमूद केले.

रेल्वे प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी फलटण-बारामती रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर असून २०२८ पर्यंत ही रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. यामुळे फलटण, बारामती आणि परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

याशिवाय मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या विस्तारित प्रकल्पाला केंद्र सरकारने तांत्रिक मान्यता दिल्याचा दावा करताना, फलटणमधील शिंदेनगर तसेच पंढरपूर येथे बुलेट ट्रेनला थांबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “मी पूर्वी बुलेट ट्रेन माढा मतदारसंघातून जाईल असे सांगितले तेव्हा अनेकांनी हसले होते; मात्र आता त्यासाठी सकारात्मक हालचाली सुरू आहेत,” असेही ते म्हणाले.

तालुक्याच्या प्रशासकीय विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, आरटीओ कार्यालय यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात प्रस्तावित नव्या जिल्ह्यांमध्ये फलटण, बारामती आणि पंढरपूर या जिल्ह्यांचा समावेश होण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पुणे-बंगळुरू नवीन महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी मिळाली असून दुसऱ्या टप्प्यात फलटण परिसरातील कामांनाही मंजुरी मिळणार असल्याचे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र-राज्य सरकारच्या सहकार्याने फलटणच्या विकासासाठी पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत,” असे सांगत त्यांनी विकासकामांबाबत आशावाद व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments