मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस फलटण येथील विंचुर्णीत साजरा; माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या फार्महाऊसवरील स्नेहभेटी

0
21
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस फलटण येथील विंचुर्णीत साजरा; माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या फार्महाऊसवरील स्नेहभेटी

पंढरपूर दौऱ्यावरून परतताना मुख्यमंत्र्यांचा विशेष थांबा; कुटुंबीयांसोबत केक कापून वाढदिवस साजरा, स्नेहभोजन व मनमोकळा संवाद

फलटण | प्रतिनिधी :  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर दौऱ्यावरून परतताना फलटण तालुक्यातील विंचुर्णी येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या फार्महाऊसवर विशेष भेट देत वाढदिवस अत्यंत कौटुंबिक आणि स्नेहपूर्ण वातावरणात साजरा केला. या अनौपचारिक भेटीची फलटणसह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरकडे जात असताना सुरवडी येथील ‘हॉटेल प्राईड इलाईट’ येथे थांबून चहापान केले. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात त्यांनी आवर्जून विंचुर्णी येथील रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या फार्महाऊसला भेट दिली. येथे त्यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला तसेच स्नेहभोजनाचा आस्वाद घेत उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.

यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन पाटील, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर, युवा नेत्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर तसेच सौ. मनीषाताई समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. सर्वांनी मुख्यमंत्र्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याशिवाय माजी खासदार रणजितदादांच्या कन्या ताराराजे व इंदिराराजे तसेच नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांचे सुपुत्र रणवीरराजे व ऐश्वर्याराजे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनीही नव्या पिढीतील सदस्यांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांचे कौतुक केले.

हा खास क्षण जिवलग मित्राच्या कुटुंबासमवेत साजरा झाल्याने संपूर्ण वातावरण आनंदमय झाले. शुभेच्छांची देवाणघेवाण, मनमोकळ्या गप्पा आणि स्नेहसंमेलनाचे वातावरण यामुळे ही भेट अधिक संस्मरणीय ठरली.

फलटणच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या भेटीची विशेष चर्चा असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातील मैत्री, विश्वास आणि परस्पर आदराचे दृढ नाते या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. सार्वजनिक जीवनातील व्यस्त दिनक्रमातही वैयक्तिक संबंध जपण्याचा संदेश या प्रसंगातून अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.