एका बाजुला उन्हाचा चटका, तर दुसऱ्या बाजुला अवकाळीचा फटका, पुणे-बंगळुरु महामार्गावर नदीचं स्वरुप

0
2


Maharashtra Rain News :  राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. काही भागात कडाक्याची उष्णता जाणवत आहे. तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. तर दुसरीकडे राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.   

रायगड जिल्ह्यात वादळी पावसाचा एक बळी

रायगड जिल्ह्यात वादळी पावसाचा एक बळी गेला आहे. तळा तालुक्यात अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कर्नाळा फळशेत गावात घडली आहे. वेदांत जनार्दन भोसले वय 14 वर्षे असे मृतकाचे नाव आहे. अवकाळी पाऊस आल्यानं सामानाची आवराआवर करत असताना वीज कोसळली. या घटनेमुळं कर्नाळा फळशेत गावावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. 

संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावली. संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील रस्ते- नाले पावसाने तुडुंब भरले आहेत. वारा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व्यावसायिक व नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. दुपारी कडाक्याचे ऊन व सायंकाळी अवकाळी पाऊस. मिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. 

पुणे-बंगळुरु महामार्गाला नदीचे स्वरुप, महामार्गावर पाच किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा 

पुणे बंगळुरु महामार्गाला कराड तालुक्यातील उंब्रज जवळ नदीचे स्वरूप आल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. साताऱ्यातील कराड व पाटण तालुक्याला आज पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले. या महामार्गावरील वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करात असताना दिसत आहे. लहान वाहने अर्धी पाण्यात बुडत होती. काही वेळापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळं महामार्गावर पाच किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कराड उंब्रज कासेगाव या ठिकाणी सुरु असल्या रस्त्याच्या कामामुळं व ठेकेदाराच्या चुकीच्या कामाचा प्रत्यय आजच्या पावसाने आला आहे.

भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी

भंडारा जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास मेघ दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील अनेक भागात कुठं हलक्या तर कुठं मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली. भंडाराच्या लाखनी तालुक्यातील पालांदूर इथं वादळी वाऱ्यासह आलेल्या या जोरदार पावसाचा चांगलाच परिणाम बघायला मिळाला. परंतु इथं आठवडी बाजार असल्याने सायंकाळच्या सुमारास आलेल्या या पावसाचा भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांसह छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनाही याचा जबर फटका बसला. अचानक आलेल्या या पावसानं भाजी विक्रेत्यांसह नागरिकांची चांगलीचं तारांबळ उडाली. मका पिकाची आणि भात पिकाची मळणी केल्यानंतर वळवायला ठेवलेल्या मका आणि धान या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात ओले झाल्यानं त्याला फटका बसण्याची चिंता आता शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. तर, काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यानं याचा नागरिकांना फटका बसलाय.

सिंधुदुर्गात अवकाळी पावसासोबत सोसाट्याचा वारा

सिंधुदुर्गात अवकाळी पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील येत आहे. यामुळं सिंधुदुर्गातील वेंगुर्ला, दोडामार्ग या तालुक्यात आंबा, काजू आणि केळी बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काढणीवर आलेल्या आंबा बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी आंबा उत्पादन केवळ दहा टक्के उत्पादन आहे. त्यात अशा प्रकारे अचानकपणे आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याची झाड तुटून पडली असून आंबे पडून वाया गेले आहेत.

गोवा राज्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस 

गोवा राज्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस कोसळला. हवामान विभागाने आज आणि उद्या गोव्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. गोवा राज्यात विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहत अवकाळी पाऊस कोसळला. मात्र उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

आणखी वाचा



Source link