Monday, August 17, 2026
Homeसाताराफलटण पंचायत समितीत कौल समसमान; सत्तास्थापना चिठ्ठीवर ठरण्याची शक्यता

फलटण पंचायत समितीत कौल समसमान; सत्तास्थापना चिठ्ठीवर ठरण्याची शक्यता


फलटण | प्रतिनिधी  फलटण पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी दोन्ही प्रमुख राजकीय गटांना समसमान कौल दिला असून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीला प्रत्येकी ८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पंचायत समितीचे सभापती व उपसभापती पद चिठ्ठीवर ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून सत्तास्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीसाठी ७२ टक्के मतदान झाले होते. आमदार रामराजे नाईक निंबाळकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युती यांच्यात थेट आणि अत्यंत चुरशीचा सामना झाला.
फलटण येथील शासकीय गोदामात सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. अनेक गटांत अल्पमताने विजय-पराभव ठरला. काही ठिकाणी फेरमतमोजणीची मागणी झाली, मात्र निकालात कोणताही बदल झाला नाही.
जिल्हा परिषद निकाल
जिल्हा परिषदेच्या ८ जागांपैकी शिवसेना (शिंदे गट) ५, तर भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीला ३ जागा मिळाल्या.
भाजपला वाठार (निंबाळकर) व हिंगणगाव गटात, तर राष्ट्रवादी काँग्रेसला गुनवरे गटात यश मिळाले. शिवसेनेने तरडगाव, साखरवाडी, विडणी, बरड व कोळकी गटांमध्ये विजय मिळवला.
पंचायत समिती निकाल
पंचायत समितीच्या १६ पैकी ८ जागा शिवसेनेला, तर ८ जागा भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीला मिळाल्या. शिवसेनेने जाधववाडी, पाडेगाव, तरडगाव, दुधेबावी, सासवड, बरड, सस्तेवाडी व सांगवी गणांत विजय मिळवला. भाजपला सुरवडी, कोळकी, वाठार (निंबाळकर), विडणी, हिंगणगाव गणांत यश आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने साखरवाडी, आसू व गुनवरे गण जिंकले.
सत्तास्थापनेकडे लक्ष
दोन्ही गटांना समान संधी मिळाल्याने पंचायत समितीत सत्ता कोणाची असेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे. सत्तेचा निकाल चिठ्ठीवर लागण्याची दाट शक्यता असून नवनिर्वाचित सदस्यांची आगामी काळात कामगिरी कसोटीची ठरणार आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments