Friday, August 14, 2026
Homeसाताराफलटण तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष अटळ – श्रीमंत रामराजे

फलटण तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष अटळ – श्रीमंत रामराजे

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये शेतकऱ्यांची बैठक; पुण्यात तीव्र विरोधाचा निर्धार

फलटण: पुणे येथे उद्या होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, फलटण तालुक्याच्या हक्काच्या नीरा उजवा कालव्याच्या पाण्याचा अन्य तालुक्यांना वाटप करण्याच्या प्रयत्नांना तीव्र विरोध दर्शवत, “फलटणच्या हक्काचे एकही थेंब पाणी बाहेर जाऊ देणार नाही, वेळ पडल्यास संघर्षाला तयार आहोत,” असा ठाम निर्धार आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कुणालाही देणार नाही
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत लक्ष्मी विलास निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुणे येथील बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मागणीला विरोध करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगोला तालुक्यातील किसंगी तलावात नीरा उजवा कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे, तर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी माचनूर उपविभागातील शाखा क्र. 2 साठी वाढीव पाणी मागितले आहे. या मागण्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठवण्यात आल्या असून, त्यावर पुण्यातील बैठकीत निर्णय होणार आहे.

फलटणच्या ऊस कारखान्यांवर परिणाम
यासंदर्भात बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले, “नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा हक्क डावलला जाणार नाही. सांगोला व माळशिरसला पाणी मिळावे याला आमचा विरोध नाही, पण तोपर्यंत नीरा खोऱ्यातील जलसाठ्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्चस्तरीय बैठक घेण्याची विनंती केली होती, मात्र त्यांनी दखल घेतली नाही. फलटणमध्ये चार साखर कारखाने असून, पाणी कमी झाल्यास ऊसशेतीवर मोठा परिणाम होईल.”

रामराजेंचा माजी खासदारांना टोला
यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता टोला लगावत म्हटले, “जे बारामतीकरांना पाणी चोर म्हणत होते, तेच आता आपल्या हक्काचे पाणी दुसऱ्या तालुक्यांना वळवण्याचा डाव आखत आहेत. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.”

यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments