Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रशहाजी काकडेंना अखेर जामीन मंजूर ! तरुणावर गोळीबार प्रकरणात

शहाजी काकडेंना अखेर जामीन मंजूर ! तरुणावर गोळीबार प्रकरणात

बारामती : शर्यतीच्या बैलाच्या वादावरून बारामती तालुक्यातील निंबुत येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे .

याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात काकडे पिता-पुत्र व अन्य तीन अशा एकूण सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शहाजी काकडे यांचे ज्येष्ठ पुत्र गौतम काकडे यांनी 5 लाख इसार देऊन फलटण येथील बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांचा ‘सुंदर’ नावाचा बैल घेतला होता. या व्यवहारातील उरलेली रक्कम नेण्यासाठी गुरुवारी 27 जून रोजी रात्री 11 वाजता निंबाळकर हे पत्नी अंकिता व अन्य सहकाऱ्यांसह काकडे यांच्या निवासस्थानी निंबुत येथे आले होते.

याप्रसंगी झालेल्या वादावादीनंतर निंबाळकर यांच्यावर गौतमचे बंधू गौरव याने गोळी झाडली. शनिवारी 29 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शिवाय या प्रकरणाने बैलगाडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.

वास्तविक शहाजी काकडे यांचे अंकिता निंबाळकर यांनी नोंदविलेल्या एफआयआरमध्ये त्यांचे नाव नव्हते. मात्र गोळीबारातील पिस्तुल परवाना त्यांच्या नावे होता, तसेच पुरावे नष्ट करण्याचा आरोपही त्यांच्यावर पोलिसांनी ठेवला होता. याप्रकरणी बारामती न्यायालयाने काकडे पिता-पुत्रांसह सर्व सहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

शहाजी काकडे यांचा मांडलेला जामीनही बारामती जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीन मागण्यात आला होता. यावर सुनावणी पार पडल्यावर उच्च न्यायालयाने मंगळवारी जमीन मंजूर केला. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड हर्षद निंबाळकर व ॲड धैर्यशील जगताप यांनी युक्तिवाद केला. सरकारी पक्षाकडून ॲड  पंकज देवकर यांनी बाजू मांडली.
ॲड  धैर्यशील जगताप म्हणाले, एफआयआरमध्ये काकडे यांचे नाव नव्हते तसेच प्रत्यक्ष घटनेत कुठल्याही प्रकारचा सहभाग नव्हता. फक्त हत्यार परवाना नावे आहे, अशी बाजू मांडल्याने उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला अशी माहिती दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments