Friday, August 14, 2026
Homeसातारासातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मुलाखती; ८ मतदारसंघातून ५८ इच्छुकांची हजेरी

सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मुलाखती; ८ मतदारसंघातून ५८ इच्छुकांची हजेरी

फलटण : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती सध्या सुरू आहेत. याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शासकीय विश्रामगृहात पार पडल्या. या मुलाखतींमध्ये सातारा जावळी, वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, फलटण आणि कोरेगाव या विधानसभा मतदारसंघांतील ५८ इच्छुकांनी आपली उपस्थिती दर्शवली.

जिल्ह्यातील आठ मतदारसंघांसाठी इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये सातारा-जावळीमधून १३, वाईमधून ७, कराड उत्तरमधून ९, कराड दक्षिणमधून ६, पाटणमधून ५, फलटणमधून १२ आणि कोरेगावमधून ६ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. या मुलाखती जिल्हा निवडणूक निरीक्षक व वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्या उपस्थितीत पार पडल्या. या वेळी ओबीसी, मुस्लिम, भटके-विमुक्त आणि इतर समाजातील उमेदवारांनीही मुलाखती दिल्या.

प्रा. साळुंखे म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारीसाठी तगड्या इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जिल्ह्यात घवघवीत यश मिळेल, असा विश्वास आहे. लवकरच इच्छुकांची यादी जाहीर केली जाईल.”

या मुलाखतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उबाठा गट) या पक्षांचेही काही इच्छुक उमेदवार उपस्थित होते. प्रा. साळुंखे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी, मुस्लिम, भटके-विमुक्त, आदिवासी यांसारख्या समूहांसाठी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे त्यांना महाराष्ट्रातील आरक्षणवादी वर्गाचा मजबूत पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यामुळे सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला मोठे यश मिळण्याची अपेक्षा आहे.

या वेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, गणेश भिसे, पूर्व जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, महासचिव अरविंद आढाव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments