पुणे प्रतिनिधी :- एक नामांकित सरकारी रुग्णालय. रात्री एक वाजताची वेळ. आणि नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला.
“थोडाही वेळ वाया न जाऊ देता, शक्य होईल तितक्या लवकर आपल्याला बाळाला, रक्तातील एक विशेष रक्त घटक द्यावा लागेल. नाहीतर परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाईल,” डॉक्टरांच्या या वाक्याने बाळाच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली.
बाळाचे आई वडील – नातेवाईक सगळे प्रयत्न करू लागले. पण हाती काही लागत नव्हते. अगदी त्याच वेळेला बाळाच्या वडिलांचे मित्र असलेल्या एका व्यक्तीने, कसलाच विचार न करता रात्री दोन वाजता राहुल यांना फोन केला. आणि त्यानंतर जे काही चक्र फिरले ते पाहून डॉक्टर देखील आश्चर्यचकीत झाले.
अर्ध्या तासापूर्वी बाळाच्या उपचारासाठी लागणाऱ्या रक्त घटकासाठी चाललेले सगळे प्रयत्न थांबले. राहुल यांना केल्या गेलेल्या एका फोन नंतर, हाताबाहेर जाईल वाटणारी परिस्थिती, क्षणातच उपचाराच्या कक्षेत आली. आणि अर्धा तासापूर्वी जणू आभाळ कोसळलेल्या आई वडिलांच्या आधाराला, पाहाडसारखा उभा राहिलेला रक्ताचा माणूस म्हणजेच अर्थात राहुल सिद्धार्थ साळवे याने पुन्हा एकदा त्याच्या माणुसपणाचे दर्शन घडविले.
बाळाच्या उपचारासाठी लागणारे रक्त घटक राहुल यांनी उपलब्ध केले. आणि बाळावर त्वरित उपचार सुरु झाले.
काही माणसं खरंच जादूई असतात. आणि राहुल याने हे वेळोवेळी आपल्या कामातून दाखवून दिले आहे.
१६ वर्षांपासून स्वतः दुःख आणि वेदनेशी दोन हात करणारा राहुल, खऱ्या अर्थाने रक्ताचा माणूस म्हणून या समाजासाठी एक सामाजिक देणंच आहे.
यापूर्वी देखील राहुल याच्या हातून घडलेल्या असंख्य सकारात्मक गोष्टींचे अनेक जण साक्षीदार आहेत. म्हणूनचं लोक राहुल याला प्रेमाने आदराने आपलेपणाने रक्ताचा माणूस म्हणून संबोधतात.
खरंतर अशी माणसं खूप कमी जन्माला येतात. पण ती जेव्हा येतात तेव्हा, कित्येकांच्या जगण्याला पुन्हा नवी पालवी देतात.
राहुल सिद्धार्थ साळवे याच्या सामाजिक जाणीवेला – त्याच्या कार्याला आणि त्याच्या माणुसपणाला पुन्हा एकदा सलाम.
