Saturday, September 12, 2026
Homeफलटणराजे उमाजी नाईक स्मारकाचे सुशोभीकरण पूर्ण झाल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही

राजे उमाजी नाईक स्मारकाचे सुशोभीकरण पूर्ण झाल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांचा ठाम निर्धार; स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाकडून आभार

फलटण : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त ७ सप्टेंबर २०२६ रोजी फलटण शहरातील राजे उमाजी नाईक स्मारक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी उपस्थित राहून राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यासाठी फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विशेष सहकार्याने निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामाला आता चालना मिळाल्याने राजे उमाजी नाईक मंडळाच्या वतीने नगराध्यक्षांचा सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

मात्र, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी या सत्काराला स्पष्टपणे नकार दिला. “स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे; मात्र जोपर्यंत स्मारकाचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत मंडळाच्या वतीने देण्यात येणारा सत्काराचा हार व नारळ मी स्वीकारणार नाही. सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरच तुमचा सत्कार स्वीकारेन,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.

राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे प्रलंबित काम पूर्णत्वास नेण्यासाठी नगराध्यक्षांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले. स्मारकाचे सुशोभीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments